ठाकरे गटाच्या 1 जुलैच्या महापालिकेवरील मोर्चाची पोलिसांनी परवानगी नाकारली ?

एक जुलैला ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी मुंबईत केली. या मोर्चाचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. पण आता या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. एक वर्ष होऊन गेलं, महापालिका विसर्जित झाली आहे. पावसाप्रमाणे निवडणूकाही लांबत चालल्या आहेत. निवडणुका घेण्याची हिम्मत आताच्या बेकायदेशीर सरकारमध्ये नाही. सध्या वारेमाप उधळपट्टी सुरु आहे. रस्त्याच्या नावाने असेल, जी 20 च्या नावाने असेल, मुंबईला कोणीही मायबाप राहिलेला नाही. सर्व लुटालूट सुरु आहे. महापालिकेतील या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी,जाब विचारण्यासाठी येत्या एक जुलैला शिवसेना ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. कायदा सुव्यवस्थेचं कारण देत मुंबई पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. दरम्यान, पक्षाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ आज दुपारी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत.

महाराष्ट्रात ईडीकडून मुंबईत सध्या कडक कारवाई सुरु आहे. ईडीने गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. मुंबई महापालिकेच्या कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. या प्रकरणात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण हे अडचणीत आले आहेत. तसेच खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय देखील अडचणीत आले आहेत. ईडीच्या या कारवाईवर ठाकरे गटाकडून टीका केली जातेय. असं असताना ठाकरे गटाने मुंबई महापालिकेत सध्या भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप करत 1 जुलैला मोर्चा काढण्याची घोषणा केलीय. पण ठाकरे गटाच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा झटका मानला जातोय.

1 जुलैला शनिवार आहे. या दिवशी महापालिकेचं कामकाज बंद असतं. सर्वसामान्यांना या मोर्चाचा त्रास होऊ नये यासाठी हा मोर्चा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. महापालिकेत भ्रष्टाचार सुरु असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. याच भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे, असं ठाकरे गटाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. पण या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

मुंबई पोलिसांनी परवानगी का नाकारली? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर मोर्चाची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा झटका मानला जातोय. दुसरीकडे पक्षाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ आज दुपारी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी ते विनंती करण्याची शक्यता आहे.