ज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावच्या दौऱ्यावर जात असून एकनाथ खडसे यांच्याकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. त्यावर फडणवीसांनी अत्यंत कडक शब्दांमध्ये खडसेंचा समाचार घेतला आहे. ळगाव येथे शासन आपल्या दारी हा सरकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याअगोदर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रावदी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खडसेंनी आता मालक बदलल्याचे फडणवीसांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखविणार असल्याचे म्हटले. यावर फडणवीसांना विचारले असता त्यांनी खडसेंना जोरदार टोला हाणला. फडणवीस म्हणाले की, काळे झेंडे दाखवून त्यांना काय मिळणार आहे. खडसेंना आता नवीन मालक मिळाला आहे. नवीन मालकाने सांगितलं तसं ते वागतात. जमिनीमध्ये जर त्यांनी तोंड काळं केलं नसतं तर त्यांना काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती. ते परिवारात राहिले असते, नवीन मालकाकडे जावे लागले नसते.
देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याबद्दल बोलतांना एकनाथ खडसे म्हणाले की, जळगाव जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिलं जात नाही. कापूस उत्पादक अडचणीत आहे. शेतकरी मरायला लागला आहे. कापसाला भाव नसल्यामुळे किमान सहा हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी करत सरकार कांदा उत्पादक, केळी उत्पादक आणि कापूस उत्पादकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
देशातील विरोधकांच्या एकजुटीबद्दल बोलतांना फडणवीस म्हणाले, हे सगळे एकत्र आलेत याचं कारण यांचे घोटाळे बाहेर निघत आहेत. त्यांच्यावर कारवाई होत आहे म्हणून ते एकत्रित आलेले आहेत. विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलो असं कुणीही म्हणत नाहीये. कारण भाजप सरकारने देशामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं केलेली आहेत.मोदीजी यांच्यामुळे देशभरात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होत आहे. नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान राहिले, तर अनेक घोटाळे बाहेर येतील. आपले सांगाडे बाहेर येतील हे लक्षात आल्यामुळे विरोधक सर्व एकत्र आले असल्याचा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला आहे.
