सुसंस्कृत महाराष्ट्रात असे कसे नेते ?



गेले दोन दिवस महाराष्ट्रात एकच चर्चा रंगली आहे. एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे सामाजिक न्याया मंत्री धनंजय मुंडे यांचं. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी येत आहे. आणि तसे होणे सहाजिक देखील आहे. नुकतेच त्यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचे आरोप लावले, मात्र या आरोपांपेक्षा त्यांचे प्रत्युत्तर अधिक झणझणीत ठरले यात काही वाद नाही. त्यांनी या आरोपांच्या प्रत्युत्तरात जी फेसबुक पोस्ट केली, त्यामध्ये त्यांनी त्यांच्या विवाहेतर संबंधाविषय खुलेपणाने सांगितले, त्यांचा विवाहाबाहेरील संबंधातून त्यांना दोन मुले असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आणि त्यांच्या या अविवाहित पत्नी करुणा शर्मा आणि त्यांची बहीण रेणू शर्मा त्यांना पैशांसाठी ब्लॅकमेल करत असल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या या केविलवाण्या प्रयत्नांपेक्षा त्यांच्या या निर्लज्जपणावर मात्र संपूर्ण महाराष्ट्राला चीड आलेली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात असे कसे नेते येतात ? सामाजिक न्याय मंत्री असून समाजाने घालून दिलेल्या अटी मोडणारे हे कोण ? आणि आता त्यांना या पदावर असण्याचा काय अधिकार असा प्रश्न आज उभा महाराष्ट्र विचारतोय.

https://www.facebook.com/DPMunde/posts/2903576766538601

आजवर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांवर विविध प्रकारच्या टीका करण्यात आल्या. काहींवर घराणेशाहीचा आरोप करण्यात आला तर काहींवर भ्रष्टाचार, काहींचे आरोप सत्य म्हणून लोकांसमोर आले तर काहींनी हे आरोप झुडकारून लावले मात्र पहिल्यांदाच महाराष्ट्रात एका नेत्याने, ते ही सामाजिक न्याय मंत्री अशा महत्वपूर्ण पदावर असलेल्या नेत्यांनी मात्र समाज माध्यमांवरुन आपल्या विवाहेतर संबंध आणि त्यातून जन्मलेल्या मुलांविषयी चर्चा केली. या सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर आणल्या, आणि त्याला महाराष्ट्राने अतिशय ‘नॉर्मलाईज’ करावं अशी अपेक्षा त्यांनी केली, हे कसं शक्य आहे? आज महाराष्ट्रात एक मुलगा आणि एक मुलगी साधे एकत्र हसत खेळत दिसले तरी मुलींच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो, आणि एका मोठ्या पदावर असलेले नेते त्यांचे असे संबंध अभिमानाने जगापुढे आणताएत. हा निर्लज्जपणा म्हणावा का बलात्काराच्या आरोपांपासून वाचण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न ?

नैतिकतेच्या दृष्टीने हे अजिबात योग्य नाही, आणि याचा विरोध, निषेध हा झालाच पाहीजे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात ज्या पद्धतीने लोक एकत्र येत आहेत, आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, त्यात काही गैर नाही असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सुसंस्कृत महाराष्ट्रात ज्यावेळी आपण आपला नेता निवडणतो त्यावेळी त्याचे काम आणि नाव बघण्याआधी त्याचे चारित्र्य बघणे महत्वाचे आहे, तरच एक समाज म्हणून आपण विकास करू शकू, अन्यथा महाराष्ट्रात असे संबंध असणे लोकांना अतिशय ‘नॉर्मल’ वाटेल, त्यात त्यांना काहीच गैर वाटणार नाही. आणि अशा संबंधांमधून अनेक घरं बरबाद होतील, गुन्हे घडतील आणि तेव्हा मात्र आपण यासाठी कुणालाच जबाबदार ठरवू शकणार नाही.

त्यामुळे आता महाराष्ट्राची जनता म्हणून आपल्याला ठरवायचं आहे कि असे चारित्र्यहीन नेते आपल्याला आपले राजनेते म्हणून हवे आहेत, का एखादा सुसंस्कृत सभ्य व्यक्ति आपला नेता म्हणून बघायचा आहे ? आपण आपला समजा घडवत असतो, त्यामुळे असे काही लोक या समाजात येता, वेळीच त्यांना समाजातून बाहेर काढणं आवश्यक आहे, अन्यथा या महाराष्ट्रात गुन्हेगारी आणि असभ्यपणा वाढायला वेळ लागणार नाही.