
अण्णा हजारे हे नाव समोर आले कि डोळ्यांपुढे येतं ते ‘जनलोकपाल बिलासाठी’ त्यांनी केलेलं ऐतिहासिक उपोषण. तेव्हा पासुन अण्णा हजारे हे नाव घराघरात पोहोचले. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या उपोषणांना तितका वाव मिळाला नाही. मात्र आता पुन्हा एकदा अण्णा हजारे उपोषणासाठी सज्ज झाले आहेत. ३० जानेवारी रोजी हुतात्मा दिवसाच्या निमित्ताने ते दिल्ली येथे उपोषण करणार असल्याची माहिती समोर येत आहे. हे उपोषण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी असेल. दिल्ली येथे जागा मिळाली नाही तर राळेगणसिद्धी येथेच उपोषण करू मात्र आता हे उपोषण होणारच असा अण्णांचा पवित्रा दिसून येतो.
कृषी मूल्य आयोगाला स्वायतत्ता देणे, स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशी लागू करून त्यानुसार शेतीमालाच्या किमती ठरविणे या प्रमुख मागण्यांसाठी हजारे यांनी आंदोलन पुकारले आहे. आपल्या आयुष्यातील हे शेवटचे आंदोलन असेल, असा निर्धारही हजारे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा अण्णांच्या या उपोषणाकडे लागलेल्या आहेत.
आंदोलनासाठी दिल्ली येथील रामलीला मैदान किंवा अन्यत्र कुठली जागा मिळावी यासाठी अण्णांनी संबंधित यंत्रणेकडे मागणी केली आहे. मात्र ही जागा त्यांना देण्यात आली कि नाही याबद्दल अजून माहिती स्पष्ट झालेली नाही. दिल्ली येथील जागा मिळाली नाही तर राळेगणसिद्धी येथील बाबा मंदिरात अण्णा उपोषण करतील असे अण्णांनी स्पष्ट केले आहे.
अण्णा हजारे यांनी आतापर्यंत अनेक महत्वाच्या कारणांसाठी उपोषण केले आहे. आता पर्यंत सरकारने देखील त्यांच्या मागण्यांचा विचार केलेला आहे. आणि त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र आता या कारणासाठी उपोषण करत असताना सरकारची काय भूमिका असेल याबद्दल जनतेला कुतूहल आहे.
