
दिल्लीत काल जो काही हिंसाचार झाला, तो अत्यंत निंदनीय आणि भयंकर स्वरूपाचा होता. या हिंसाचारात तब्बल ३०० हून अधिक पोलिस जख्मी झाले आहेत. आणि देशाच्या प्रजासत्ताक दिनी संविधानाला काळं फासणारी ही घटना ठरली. मात्र या सगळ्यात एक प्रश्न असा उपस्थित होतो, हे करणारे खरंच शेतकरी आहेत का ? देशाचा अन्नदाता जो भूक भागवतो, आणि देशाच्या मातीची लाज राखतो, तो आज अशा पद्धतीने देशाची प्रतिमा जागतिक पटलावर धूसर करेल का ? कि शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतंय ?
काल देशाचा ७२ वा प्रजासत्ताक दिन होता. हा दिवस संविधानाने आपल्याला दिलेल्या अधिकारांसह आपल्याला दिलेल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतो. याच दिवशी देशाच्या राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांतर्फे ‘ट्रॅक्टर रॅली’ आयोजित करण्यात आली होती. या रॅलीसाठी पोलिसांनी मोठ्या विश्वासासह तीन मार्ग आखून दिले होते, मात्र शेतकऱ्यांच्या मुखवट्याखाली असलेले हे आंदोलनकारी सुरुवातीपासूनच आक्रामक झाले. ट्रॅक्टरचा वापर त्यांनी पोलिसांचा जीव घेण्याच्या प्रयत्नासाठी केला, तर ठरवलेले मार्ग झुडकारून त्यांनी आपलाच मार्ग निवडला आणि अक्षरधाम मंदिर, आयटीओ आणि दिल्लीतील प्रमुख वास्तू लाल किल्ला येथे जावून तेथील तिरंगा काढून त्यांनी आपले झेंडे लावले. या झेंड्यांमध्ये खलिस्तानी झेंड्यांचा देखील समावेश होता. आता हे सर्व कृषिबिलाविरोधात असणं कसं शक्य आहे, का यामागे आणखी काही हेतू आहे ? असा प्रश्न इथे उपस्थित होतो.
या भारताने, देशासाठी स्वत:चे प्राण बलिदान करण्याऱ्या भगतसिंग ला बघितले आहे, मुगल शासकांसमोर गुडघे न टेकणाऱ्या आणि आपल्या संपूर्ण परिवाराचे बलिदान देणाऱ्या गर गोविंद सिंह यांना बघितले आहे. देशात सगळ्यांच्या मदतीसाठी प्रसिद्ध असलेल्या सिख बांधवांना बघितले आहे, नाव, धर्म जात पात न विचारणाऱ्या आणि पोट भर लंगर खाऊ घालणाऱ्या अनेक गुरुद्वाऱ्यांना बघितले आहे. एक सच्चा देशभक्त सिख बांधव, देशाविरोधात अशी गद्दारी कधीच करणार नाही. काल दिल्लीत उन्माद करणारे शेतकरी बांधव असूच शकत नाहीत.
आज देशात फूट पाडण्यासाठी अनेक लोक कार्यरत आहेत, काही छुपे, तर काही खुल्या पद्धतीने आपण वाहवत न जाता यामागे नेमका काय हेतू आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तरंच आपण या देशाचा विकास करू शकू.
