यासाठी आहे भारताचा ७२ वा प्रजासत्ताक दिन खास…!


भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची प्रत्येक भारतीय आतुरतेने वाट बघतो. दरवर्षीच या कार्यक्रमामध्ये काही ना काही खास असतं. मात्र यावेळचा प्रजासत्ताक दिन अनेक कारणांसाठी खास होता. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर प्रजासत्ताक दिनाची परेड सार्वजिनक पद्धतीने कशी होणार, यामध्ये सामान्य नागरिकांना सहभागी होता येईल का ? असे अनेक प्रश्न भारतीयांच्या मनात होते, मात्र आजच्या कार्यक्रमाने लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. 


या कारणांमुळे या वर्षीचा प्रजासत्ताक दिन अतिशय खास होता :



१. रफैल विमानाचे आगमन :
प्रत्येक भारतीयाला रफैल विमानाला बघण्याची खूप उत्सुकता होती. अखेर यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात या विमानाचा समावेश करण्यात आला आणि वायुसेनेच्या प्रदर्शनात रफैल चे उत्तम प्रदर्शन बघून भारतीयांच्या माना अभिमानाने उंचावल्या. अतिशय देखणे असे हे प्रदर्शन होते.


२. उत्तर प्रदेशच्या झाँकी मध्ये राम मंदिराचा रथ : भारतीयांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या राममंदिराच्या रथाने यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची शोभा वाढविली. अनेक वर्षांपासून भारतीयांचे स्वप्न होते कि अयोध्येत भव्य राममंदिराचे निर्माण व्हावे, अखेर या स्वप्नाची सुरुवात ५ ऑगस्ट २०२० रोजी झाली अयोध्येत झालेल्या भूमिपूजनापासून, त्यामुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात रांदमंदिर तर असायलाच हवे नाही का ? आज राजपथावरुन जेव्हा हा रथ दिमाखात निघत होता, तेव्हा सगळ्यांने अभिमानाने उभे राहून टाळ्या वाजवून राममंदिराचे स्वागत केले, देशाच्या जनतेच्या भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. एक अविस्मरणीय असा हा क्षण होता.


३. प्रथम महिला फायटर पायलटचा समावेश : यंदाच्या कार्यक्रमात वायुसेनेच्या एअर शो मध्ये प्रथमच भारताच्या पहिल्या महिला फायटर पायलट भावना कांत हिचा देखील समावेश करण्यात आला. भारताच्या या शूरवीर कन्येवर संपूर्ण भारताला अभिमान आहे. अतिशय गौरवान्वित करणारा असा हा क्षण होता.

४. लद्दाखच्या झाँकीचा समावेश : यावर्षी विविध राज्यांच्या निघणाऱ्या झाँकीत लद्दाखचा देखील समावेश करण्यात आला. भारताचे आणखी एक स्वप्न काही महिन्यांआधी पूर्ण झाले, ते म्हणजे जम्मू काश्मीर येथून धारा ३७० काढून टाकणे. एक अविस्मरणीय अशी ती घटना होती. त्यामुळे लद्दाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले, आणि लद्दाखच्या झांकीचा पहिल्यांदाच या परेडमध्ये समावेश करण्यात आला होता.



५. बांग्लादेशच्या सेनेच्या तुकडीचे दिमाखात प्रदर्शन : यंदा पहिल्यांदाच बांग्लादेशच्या सेनेच्या एका तुकडीचे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात दिमाखात प्रदर्शन झाले. या आधी या कार्यक्रमात २०१७ आणि २०१७ मध्ये अनुक्रमे फ्रांस आणि यूएईच्या सेनेच्या तुकड्यांचे असेच प्रदर्शक करण्यात आले होते. भारताच्या मित्र राष्ट्रांसोबत असलेल्या आपुलकीच्या संबंधांचे हे प्रतीक आहे.

प्रजासत्ताक दिन नेहमीच खास असतो. दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या कार्यक्रमामुळे त्याचे महत्व अधिकच वाढते, मात्र जेव्हा या कार्यक्रमात रफैल विमान, राम मंदिराचा रथ आणि प्रथम महिला फायटर पायलटचा समावेश होतो, तेव्हा हा कार्यक्रम आणखीनच खास होऊन जातो, नाही का ?