
पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात हिंदुंविरोधी भयानक विधानं करणाऱ्या शरजील उस्मानीचं हे सरकार आहे, त्याला संरक्षण देणारं हे सरकार आहे. असं विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. भारतीय जनता पक्षाच्या मुंबई मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शरजील उस्मानी विषयात प्रश्न विचारला असता ते म्हणाले कि, “शरजील उस्मानी ने केलेल्या विधानानंतर त्यावर कारवाई का करण्यात आली नाही ? असा प्रश्न उत्तरभारतीय आघाडीने विचारला असता त्यांच्या घरात घुसुन त्यांना अटक करण्यात आली, मात्र शरजील वर काहीच कारवाई करण्यात आली नाही. असे असताना आम्ही जर असे म्हटले कि हे सरकार शरजीलचे सरकार आहे, आणि शरजीलला संरक्षण देणारे सरकार आहे, तर यात गैर काय आहे ?”
तसेच यावेळी फडणवीस यांना सेलिब्रिटीजने ट्वीट केल्यावर चौकशीच्या निर्णयासंबंधी, प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ते म्हणाले कि, “ज्यांनी चौकशीची मागणी केली, आणि ज्यांनी ही मागणी मंजूर केली, त्या दोघांचेही मानसिक संतुलन ठीक नाही. चौकशी तर त्यांच्या मानसिक संतुलनाची व्हायला हवी. कारण भारताच्या सार्वभौमत्वाशी छेडछेड सहन केली जाणार नाही, असं ट्विट आहे. भारताच्या अखंडतेवर हल्ला होऊ देणार नाही, असं म्हणणं चुकीचं असेल तर आपल्या सगळ्यांना सरकारनं अटक करावं, अशी टीका फडणवीस यांनी केली.
एकूणच सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणासंबंधी आणि परिस्थिती संबंधी भाजप सरकारवर नाराज असल्याचे दिसून येत आहे. “भारत एकसंध आहे, आणि कुठलाही प्रपोगंडा भारताला भंग करू शकत नाही” अशा आशयाचे ट्वीट केल्यानंतर सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर चौकशी बसवण्यात आली आहे, यामुळे महाराष्ट्राची जनता देखील सरकार वर नाराज आहे.
