परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बने महाराष्ट्र सरकार हालले, अनिल देशमुखांवर निशाणा



महाराष्ट्रातील बहुचर्चित सचिन वाझे प्रकरणाला आता एक नवीन वळण लागलं आहे. माजी पोलिस कमिश्नर रपमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ८ पानी पत्र लिहीत मोठे खुलासे केले आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी म्हटले आहे कि, गृहमंत्री अनिल देशमुख हे सचिन वाझे यांच्याकडून दर महिन्याला १०० कोटी रुपयांची मागणी करत होते. भ्रष्टाचाराचा एवढा मोठा आरोप गृहमंत्र्यांवर होणे म्हणजे महाराष्ट्राच्या नावाला काळिमा फासण्यासारखे आहे. या संपूर्ण घटनेविरोधात माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रामक भूमिका घेत या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडून व्हायला हवा, अशी त्यांनी मागणी केली आहे.



या पत्रातून परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर मोठे आरोप केले आहेत. अनिल देशमुख, सचिन वाझे यांना अनेकदा आपल्या घरी बोलवायचे, तसेच ते फंडची मागणी देखील करत होते. दरमहा मुंबईतील विविध बारच्या माध्यमातून १०० कोटी रुपये जमा करुन देण्याची मागणी त्यांनी सचिन वाझेकडे केली होती, असेही यापत्रातून स्पष्ट झाले आहे. एकूणच या पत्रामुळेठाकरे सरकारवर खूप मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. विरोधी पक्षाने अनिल देशमुख यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यासाठी आज भाजपचे अनेक कार्यकर्ते विरोध प्रदर्शने करत रस्त्यावर उतरले आहे.

एकूणच या घटनेमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप आलेला आहे. या संदर्भात शिवसेनेचे प्रमुख नेते संजय राऊत यांनी ‘नो कमेंट्स’ अशी टिप्पणी केली आहे, त्यासोबतच ते म्हणाले आहेत कि, “यामुळे सरकारला धोका नाहीये, मात्र सरकारमध्ये काही आंतरिक बदल करण्यात येतील.” हे पत्र खूप स्फोटक आणि अनेक खुलासे करणारं आहे. संपूर्ण देशातून आज महाराष्ट्र सरकारची निंदा करण्यात येत आहे.



काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसच्या लोगोचे डीपी लावणारे आणि उद्धव ठाकरे यांना ‘बेस्ट सीएम’  म्हणणारे आणि अनिल देशमुख यांचे कौतुक करणारे बॉलिवुड सेलिब्रिटीज आता कुठे गेले ? ते आता का गप्प आहेत ? खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का म्हणून गप्प आहेत ? असा प्रश्न येथे उपस्थित होतो. यामध्ये आता पुढे काय होणार आहे ? हे बघणं महत्वाचं ठरेल.