
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबईत मानसूनने वेळेवर हजेरी लावलेली आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झालेली आहे. मुंबईत या जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले आहे. त्यातून नुकतेच काही प्रमाणात अनलॉक झाल्यामुळे नागरिक आता कामानिमित्त किंवा इतर कारणांनी बाहेर पडत आहेत, असे असताना मुंबईत या दरवर्षी साचणाऱ्या पावसाचे काय करावे? हा प्रश्न निर्माण होतो, मात्र याकडे महापौर किशोरी पेडणेकर यांनी मात्र काणा डोला केलेला दिसतोय. त्यांना याविषयी विचारण्यात आल्यानंतर “मुंबईत पाणी साचणार नाही असे आश्वासन कधी कुणी दिलेच नव्हते” असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईत दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येची जबाबदारी महापौरांनी टाळली का? असा प्रश्न येथे उपस्थित होतो.
“मान्सूनच्या पहिल्याच दिवशी खूप पाऊस पडला, असा दावा कुणीच करू शकत नाही कि, जिथे स्वच्छता करायची असते तिथे आम्ही करतोच. मात्र मुंबईत कुठेही पाऊस पडला तर ३-४ तास पाणी साचतच, मात्र ते ३-४ तासात निघून जातं.” अशा आशयाचं वक्तव्य महापौरांनी आज दिलं. मुंबईच्या महापौरांनी असं वक्तव्य करावं म्हणजे त्यांनी आपली जबाबदारी टाळण्यासारखं झालं. एका शहराच्या महापौरांनी “शहरात तीन-चार तास पाणी तर जमा होतंच” असं वक्तव्य बेजबाबदारपणाचं नाही का ? असा प्रश्न इथे निर्माण होतो.
दरवर्षी मुंबईच्या पावसात अनेक लोकांना, अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात पाणी जमा झाल्याने रोगराई वाढणे तर आहेच. मात्र त्याशिवाय दरवर्षी पावसाळ्यात वाढणारे अपघात, पाणी जमा झाल्याने नालीत पडून वाहून जाणारी लोक, आणि अशा अनेक समस्या आहेत. मुंबईच्या पाणी साचण्याचा प्रश्न कसा सोडवता येईल आणि तो कोण सोडवेल? हे आता एक मोठे कोडे आहे.
पाणी साचलं त्यावेळी हायटाईड, मोठा पाऊस आणि वॉटर टेबलमधूनही पाणी बाहेर येत होतं अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी थोडं थांबणं गरजेचं आहे, असं सांगत आज मुंबईप्रमाणंच पुण्यातही पाणी तुंबल्याचं उदाहरण त्यांनी दिलं. शिवाय चार तासांहून अधिक वेळेसाठी साचलेलं पाणी शहरात थांबत नाही, असा दावाही त्यांनी केला.
एकूणच मुंबईचा पाऊस जितका सुंदर आणि रोमँटिक वाटत असला, तरी अनेकदा तो लोकांचा जीव घेणाराही झालेला आहे, त्यामुळे मुंबईच्या पाणी साचण्याचं येत्या काही वर्षात काही होतं का आणि या समस्येचा तोडगा निघतो का ? याकडे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
