
राज्यात आता हळू हळू अनलॉक होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हळू हळू दुकाने इत्यादि सुरु होत आहे. मात्र अनलॉक झाल्याने राज्यात आता पुन्हा एकदा थोड्या फार प्रमाणात रुग्णांची संख्या वाढणार. रुग्णांच्या संख्येवरुन राज्यात वाद विवाद सुरु आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात लाखो मृत्यु झाले मात्र त्यापैकी ११.५ हजार मृत्यूंची संख्या लपवण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विटर वर ही बातमी शेअर करत म्हटले आहे कि, “कोरोनाचे रुग्ण कमी की अधिक हा प्रतिष्ठेचा मुद्दा नाही.”
“कोरोनाचे कमी-अधिक मृत्यू हा प्रतिष्ठा किंवा अप्रतिष्ठेचा प्रश्न नाही, तर कोरोनाविरोधातील लढ्यातील तो महत्त्वाचा दुवा/संदर्भ आहे. त्यामुळेच त्यातील पारदर्शिता अधिक महत्त्वाची ठरते. महाराष्ट्रातील मृत्यू लपवू नका, म्हणून आम्ही सातत्याने पत्रव्यवहार केला, अनेकदा आवाज उठविला.” असेही ते यावेळी म्हणाले. एकूण राज्याच जे मृत्यु झाले, जी संख्या बाहेर आली, त्यापेक्षा ही संख्या किती अधिक आहे, याची नोंद कुणीच ठेवू शकलेले नाही. काही कारणांनंतर स्पष्ट झाले कि ११.५ हजार मृत्यु लपवण्यात आले. मात्र आता हा आकडा वाढणार कि तितकाच राहणाच याची शाश्वती नाही.
देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आणि कोरोनाने मृत्यु झालेल्या लोकांची संख्या देखील सर्वाधिक महाराष्ट्रातच आढळली. असे असताना, राज्याने याला प्रतिष्ठा किंवा अप्रतिष्ठेचा मुद्दा न बनविता, याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक होते, किंबहुना आहे आणि आकडे न लपवता खरी परिस्थिती बाहेर आणणं आवश्यक आहे, कारण यावरुनच राज्याचे किती नुकसान (जनहानि) झाली आहे? याचा थांगपत्ता लागेल, त्याशिवाय पुढे काय व्यवस्था करण्यात यावी? तिसरी लाट आलीच तर त्यावेळेला काय पावले उचलण्यात यावी हे ठरवण्यात मदत होईल.
आकडा लपवून व्यवस्थापनेत असलेली कमतरता लपवता येत नाही, ती समोर येतेच. त्यामुळे राज्य सरकारने आकडे न लपवता खरी परिस्थिती समोर आणावी आणि यापुढे यासाठी काय करता येईल ? अधिक चांगली आरोग्य व्यवस्था कशी निर्माण करता येईल तसेच नागरिकांच्या जीवाची काळजी कशी घेता येईल याकडे लक्ष द्यावे, ही जनतेची कळकळीची मागणी आहे.
