मनुष्य जीवनातील गेली 2 वर्षे कोरोनाने गिळंकृत केली आहे, तरी देखील आपण सर्व दररोज नव्या उत्साहाने आपापल्या कार्यात लागतो, आणि एका सुंदर भविष्याचे स्वप्न बघतो. असे असताना देखील वास्तव्यापासून दूर जाणे आपल्यासाठी काही योग्य ठरणार नाही. त्यामुळे कोरोनाची आता तिसरी लाट उंबरठ्यावर दिसत असताना, आपण तयार आहोत का ? हा प्रश्न इथे निर्माण झाला आहे. राज्यात एका आठवड्यातच कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. आणि ही वाढ काही साधीसुधी नसून 181% ची वाढ आहे. हे आकडे सूचक आहेत, आणि आपल्याला धोक्याचा इशारा देणारे आहेत, असे असताना आपण सज्ज आहोत का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

2021 च्या मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आणि अनेक हष्ट पुष्ट नैजवान आपल्यातून नाहीसे झाले. जवळ जवळ प्रत्येकाच परिवारातील कोणी ना कोणी आपल्या आप्तेष्टांना, परिवारातील, मित्र परिवारातील सदस्याला गमावले. रोहित सरदाना सारख्या अतिशय ‘फिट’ अशा पत्रकाराच्या मृत्यूने तर सगळ्याना भेडसावून सोडले. अशी परिस्थिती असताना तिसरी लाट याहूनही भयंकर तर नसेल ना, तसे असल्यास आपण समाज म्हणून आणि राज्यकर्त्यांने सरकार म्हणून कुठल्या जबाबदाऱ्या पार पाडणे आवश्यक आहे, याकडे लक्ष देण्याची आता वेळ आली आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे कारण असल्याशिवाय ट्रॅव्हल प्लॅन्स करू नका, घराबाहेर पडू नका. तसे केल्यास मास्क लावणे बंधनकारक असेल, आणि सतत हात सॅनेटाइज करत रहा. अशा काही अतिशय जुजबी मात्र महत्वाच्या गोष्टी पाळणं अत्यावश्यक आहे.
देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्याशिवाय कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनबाधितांमध्येही वाढ होत आहे. रविवार संपलेल्या आठवड्यात मागील सात दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत तीनपटीने वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील आठवड्यात देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत 181 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता देशात कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याचे म्हटले जात आहे.
देशात एकाच आठवड्यात (27 डिसेंबर ते 2 जानेवारी) जवळपास 1.3 लाख नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ही संख्या मागील 12 आठवड्यातील सर्वाधिक संख्या आहे. या आधी सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद 5 ते 11 एप्रिल 2021 दरम्यान नोंदवण्यात आली होती. त्यावेळी देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू होती.
एकूणच पुन्हा एकदा वेळ आली आहे, कि आपण स्वत:ची आणि स्वत:च्या परिवाराची अधिक काळजी घ्यावी. सरकारने इतर बाबींवर लक्ष न देता, प्राथमिकतेने आरोग्य व्यवस्था, खाटांची योग्य संख्या, डॉक्टर्सची उपलब्धता, आणि गरज पडल्यास ऑक्सिजनची व्यवस्था हे सर्व आवश्यक तितकं आहे ना ? याकडे लक्ष देणं आता खूप महत्वाचं आहे.
प्रश्न काही दिवसांचा आहे, लाट जरी आली आहे, तशी ओसरेलही मात्र आपण काळजी घेतली तर आपण या लाटेचे बळी होणार नाही, आणि इतरांनाही होऊ देणार नाही, याची काळजी मात्र आपण सर्व घेऊयात.
