
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबच्या फिरोजपुर येथे मोठी रॅली आयोजित करण्यात आली होती, मात्र पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटींमुळे ही रॅली रद्द करण्यात आली. देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेली ही एक खूप मोठी गफलत होती | फिरोजपुर येथे आयोजित करण्यात आलेल्या रॅलीसाठी पंतप्रधान भटिंडा एअरपोर्टवर हजर होते, येथून ते हॅलिकॉप्टर ने जाणार होते, मात्र वातावरण खराब असल्याने त्यांनी गाडीने जाण्याचा निर्णय घेतला. फिरोजपुरच्या जवळच भारतीय किसान संघाचे अनेक कार्यकर्ते रस्त्यावर मोर्च्यासाठी उतरले. ही संख्या बऱ्यापैकी मोठी होती. पंतप्रधानांच्या ताफ्याला १५-२० मिनिटे थांबावे लागले. रस्त्यावर जमलेल्या मोठ्या संख्याकडे बघून पंतप्रधानांनी फिरोजपुरला जाण्याचा निर्णय रद्द केला. आणि यावरुन खूप मोठा गदारोळ झाला.
भटिंडा एअरपोर्टवर आल्यावर पंतप्रधानांचे वक्तव्य होते “तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा कि मी भटिंडा एअरपोर्ट पर्यंत जीवंत पोहोचू शकलो.” त्यांच्या या एका वक्तव्यातूनच संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होते.
या संपूर्ण प्रकरणानंतर, पंतप्रधान मोदी दिल्लीला परतले. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता. पंतप्रधान मोदी पंजाबमधील जनतेला संबोधित करणार होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे देखील या रॅलीत सहभागी होणार होते.
पंजाबच्या फिरोजपूरमधील रॅली रद्द करण्यावर केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, “अनेक कारणांमुळे पंतप्रधान दौऱ्यात आमच्यात नसणार आहेत, मात्र आम्ही हा कार्यक्रम रद्द न करता, पुढे ढकलत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटले आहे.”
गृहमंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटलं की, “बुधवारी सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे दाखल झाले, तेथून ते हुसैनवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु, पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे पीएम मोदींना सुमारे 20 मिनिटे प्रतीक्षा करावी लागली होती.”
यासंपूर्ण प्रकरणात भारतीय किसान संघाने (BKU) पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या उल्लंघनात आपली भूमिका मान्य केली आहे. भारतीय किसान संघाचे सुरजित सिंह फूल यांनी दावा केला आहे की, पंजाब पोलिसांनीच पंतप्रधानांच्या मार्गाची माहिती त्यांना लीक केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रासोबत बोलताना त्यांनी हा दावा केलाय.
