
“पंजाब येथील फिरोजपुर जवळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जे झालं, ते अतिशय भयंकर आणि पंजाब सरकारच्या प्रतिमेला काळिमा फासणारं होतं. मात्र त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी जी विधानं केलीत ती म्हणजे निर्लज्जतेचा कळस आहेत.” असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंतप्रधानांच्या सुरक्षेसोबत झालेल्या घटनेनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा आशीर्वाद मिळाला आहे. त्यांच्या विरोधात कटकारस्थान रचणाऱ्यांना देश कधीच माफ करणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. “पंतप्रधानांच्या सुरक्षेचा झालेला खेळखंडोबा, देशासाठी शरमेची बाब आहे, आणि जे लोक यासाठी जबाबदार आहेत, अशा सर्व लोकांवर कठोर कार्यवाही झालीच पाहीजे.” असेही ते यावेळी म्हणाले.
“त्याचसोबत काँग्रेसचे नेते ज्या बेशरमीने पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात वक्तव्य करताएत, हे निर्लज्जतेचा कळस आहे. इतकी निर्लज्जता कुठल्याही राजकीय पक्षात या पूर्वी बघण्यात आली नाही. ही केवळ निर्लज्जता नाही तर अपरिपक्वता देखील आहे. ही एक कूपमंडूक मनोवृत्ति आहे, या मनोवृत्तिचा आम्ही निषेध करतो.” अशा भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
भारतीय जनतेच्या आशीर्वादामुळे मोदीजींच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे ठाम वक्तव्य फडणवीसांनी या पत्रकार परिषदेत केले
.
काय आहे प्रकरण :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबच्या फिरोजपुर येथे मोठी रॅली आयोजित करण्यात आली होती, मात्र पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटींमुळे ही रॅली रद्द करण्यात आली. देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेली ही एक खूप मोठी गफलत होती | फिरोजपुर येथे आयोजित करण्यात आलेल्या रॅलीसाठी पंतप्रधान भटिंडा एअरपोर्टवर हजर होते, येथून ते हॅलिकॉप्टर ने जाणार होते, मात्र वातावरण खराब असल्याने त्यांनी गाडीने जाण्याचा निर्णय घेतला. फिरोजपुरच्या जवळच भारतीय किसान संघाचे अनेक कार्यकर्ते रस्त्यावर मोर्च्यासाठी उतरले. ही संख्या बऱ्यापैकी मोठी होती. पंतप्रधानांच्या ताफ्याला १५-२० मिनिटे थांबावे लागले. रस्त्यावर जमलेल्या मोठ्या संख्याकडे बघून पंतप्रधानांनी फिरोजपुरला जाण्याचा निर्णय रद्द केला. आणि यावरुन खूप मोठा गदारोळ झाला.
भटिंडा एअरपोर्टवर आल्यावर पंतप्रधानांचे वक्तव्य होते “तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा कि मी भटिंडा एअरपोर्ट पर्यंत जीवंत पोहोचू शकलो.” त्यांच्या या एका वक्तव्यातूनच संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होते.
