भारतात पुन्हा लॉकडाउन लागणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्पष्ट संकेत…!



देशात लॉकडाउन लागला तर उद्योग आणि रोजगार याचे काय होईल अशी चिंता समाजातील एका मोठ्या वर्गाला लागून राहिली आहे, असे असताना देशात पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार नाही, असे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणायची असेल तर स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करुन या आजाराला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचं मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. देशभरातील 30 राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान जनतेशी संवाद साधत होते.

कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची सूचना पंतप्रधानांनी राज्यांना दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “केंद्राने राज्यांना 23 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्याचा वापर करुन अनेक राज्यांनी आपल्या आरोग्यविषयक सुविधांचा चांगला विकास केला. भविष्यातील आरोग्यविषयक संकटं लक्षात घेता आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा जास्तीत जास्त चांगल्या कराव्यात.”


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “होम आयसोलेशनमध्ये जास्तीत जास्त उपचार होणं शक्य आहे. त्यामुळे होम आयसोलेशन संबंधी नियमांचे पालन करावं. ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट योग्य पद्धतीने केल्यास रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही.”

एकूणच ‘लॉकडाउन’ मुळे अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण पडतो. असे नागरिक ज्यांचे पोट हातावर आहे, त्यांच्यासाठी लॉकडाउन जीवघेणे ठरू शकते, त्यामुळे देशातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ द्यायचा नसेल, तर आपण सगळ्यांना एकत्र येऊन नियम पाळणे आवश्यक आहे. लॉकडाउन लागू द्यायचे नसेल तर मास्क लावा, काळजी घ्या आणि घरी राहून नियमांचे पालन करा.