
आज पासून संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. या अर्थसंकल्पात काय असेल? नागरिकांना, मध्यमवर्गीयांना दिलासा देणारं हे अर्थसंकल्प असेल का ? याविषयी जनतेच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. महागाई या वर्षीच्या अर्थकंल्पासाठी एक महत्वाचा मुद्दा आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गेल्या वर्षाचे आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आले आहे. नव्या आर्थिक वर्षात जीडीपी 8 ते 8.5 टक्के राहण्याचा अंदाज यावेळी वर्तविण्यात आला आहे. कृषी क्षेत्रात ३.९ टक्के,तर उद्योग क्षेत्रात ११.८ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे यावेळी सरकारने स्पष्ट केले.
सशक्त भारताच्या निर्मिती मध्ये केंद्र सरकारचे महत्वपूर्ण योगदान : राष्ट्रपती
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरवातीला राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी आपले उद्बोधन दिले. यामध्ये ते म्हणाले कि, “सशक्त भारताच्या निर्मितीमध्ये केंद्र सरकारचे महत्वपूर्ण योगदान आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तेथील महिलांनी मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले आहेत, यामध्ये ग्रामीण महिलांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सबलीकरणासाठी उज्ज्वला योजना, बचतगटांच्या योजना यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. असंही ते यावेळी म्हणाले. राष्ट्रपतींनी त्यांच्या उद्बोधनात केंद्र सरकारचे कौतुक केले आहे.
“देशात आज 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचा कोरोना लसीचा एक डोस पूर्ण झाला आहे तर 70 टक्के लोकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. लसीकरणात देश जगात अव्वल आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ हा सरकारचा मंत्र असून सशक्त भारत तयार करण्यामध्ये केंद्राचं महत्वाचं योगदान आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
आज वैश्विक स्तरावर भारतासाठी खूप संधी – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदींनी अधिवेशनात सर्वांनी चर्चा करावी आणि देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी उत्तम चर्चा व्हावी असं आवाहन केलं आहे. “अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. मी या अधिवेशनात सर्वांचं स्वागत करतो. आज वैश्विक स्तरावर भारतासाठी खूप संधी आहेत. देशाची आर्थिक प्रगती, लसीकरण कार्यक्रम, मेड इन इंडिया वॅक्सिनबाबत जगात एक विश्वास तयार झाला आहे. या अधिवेशनातही यावर मुक्त चर्चा होईल जेणेकरुन जगभरात एक विश्वास तयार होईल अशी चर्चा व्हावी.” असं मोदी म्हणाले.
या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सामान्य नागरिकाला काय फायदा होतो आणि सामान्य नागरिकांना डोळ्यांपुढे ठेवून यावर्षीच्या अर्थसंकल्पात काय निर्णय घेण्यात येतात, हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.
