केवळ टीका आरोप आणि टोमणे या शिवाय राज्य सरकारकडून काहीच होत नाही : फडणवीस



“सुख थोडे आणि दु:ख फार” विं.दा. करंदीकरांच्या ‘तेच ते आणि तेच ते’ या कवितेच्या माध्यमातून विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची दु:खद परिस्थिती विधानसभेत मांडली. ते म्हणाले कि, “केवळ टीका, आरोप आणि टोमणे या शिवाय राज्य सरकार कडून काहीच होत नाही.” यावेळी फडणवीस यांनी सरकारला टोला हाणत, “अतिशय विचार करून म.वि.आ. असे या सारकराचे नाव ठेवण्यात आले आहे, कारण ही महाविकास आघाडी नव्हे तर महाविनाश आघाडी आणि मग महावसूली आघाडी झाली.” असे देखील ते म्हणाले.

कोरोनाकाळात ‘क्लास बंद आणि ग्लास सुरु’ :

ते पुढे म्हणाले कि, “या सरकारने पेट्रोल आणि डीझेलवरचा कर कमी केला नाही, मात्र दारु वरील कर ५०% कमी केला, त्यानंतर बार परवान्यांवर कर कमी केला, चंद्रपूरची दारूबंदी मागे घेतली. म्हणजेच कोरोनाकाळात मंदिर बंद आणि मदिरालय सुरु होते आणि क्लास बंद आणि ग्लास सुरु होते. या सरकारने महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र केले. अशी परिस्थिती या सरकारमुळे आपल्या महाराष्ट्रावर आली.”



“ज्यांनी व्यसनमुक्तिसाठी संपूर्ण आयुष्य आपलं समर्पित केलं त्या अनिल अवचटांना या सरकारने सकाळी श्रद्धांजली दिली आणि दुपारी मंत्रीमंडळ बैठकीत किराणा दुकानांमध्ये वाईनविक्रीचा निर्णय घेतला. आमच्या समोर प्रश्न एवढाच आहे कि, आता ड्राय डे ला किराणा दुकान आणि सूपर शॉप्स बंद राहतील का? एक प्रवक्ते म्हणतात वाईन ही दारू नाही, मग असे असताना ड्रंग एण्ड ड्राइव्ह मधून वाईन वगळली जाईल का?” असे काही प्रश्न यावेळी फडणवीस यांनी सरकारला विचारत सरकारची पळता भुई थोडी केली.

मुंबई महानागर पालिका भ्रष्टाचारावर सरकारला चपराक:

‘मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर पालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हटलं आहे. ही अशी परिस्थिती झाली आहे आपल्या मुंबई महानगर पालिकेची. मात्र महानगर पालिकांच्या इंडेक्स मध्ये फायनॅंशिअल मॅनेजमेंटमध्ये मुंबई महानगर पालिका ही ४५ व्या क्रमांकावर आहे. नवी मुंबई, पुणे, अगदी नागपुर देखील मुं.म.न.पा.च्या पुढे गेले आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणात त्यांनी ‘सफाई कामगारांना घर’ देण्याची योजना मांडली. या योजनेला चेहरा खूप सुंदर देण्यात आला आहे. मात्र यामध्ये सफाई कामगारांच्या नावावर कशा पद्धतीने आपल्या तिजोऱ्या भरण्यात आल्या हे आमचे सहकारी स्पष्ट करतील. यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. असे देखील ते यावेळी म्हणाले.

फडणवीसांनी अनेक महत्वाच्या विषयांवरून सरकारला टोले हाणले, तसेच जनतेच्या वतीने काही प्रश्न सरकारसमोर उपस्थित केले. सरकार या प्रश्नांची दखल घेते का? या संदर्भात पुढे काय होते, हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.