
“आता पर्यंत मुख्यमंत्री गप्प होते, तर आम्हाला देखील वाटले होते, कि मुख्यमंत्र्यांच्या मनात देखील ती धग शिल्लक आहे, जी आमच्या सगळ्यांच्या मनात मुंबईच्या गुन्हेगारांच्या विरोधात आहे. मात्र आज ज्यावेळी त्यांनी नवाब मलिकांचे समर्थन केले, त्यावेळेला आम्हाला अत्यंत दु:ख वाटले, आणि आज हे स्पष्ट झाले कि मुख्यमंत्री सत्तेसाठी पुरते लाचार झाले आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री या सत्तेत पूर्णपणे मुरले आहेत. मुख्यमंत्र्यांचे आजचे भाषण हे शिवाजीपार्कावरील भाषण वाटले, विधानसभेतील भाषण नाही. असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज विधानसभेत गदारोळ झाला, विरोधीपक्षाने सभात्याग केला, त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस बोलत होते.
सरकार अहंकारामध्ये बुडाले आहे :
सरकार अहंकारामध्ये पूर्णपणे बुडाले आहे. आम्ही जो कायदा करू तो बरोबर, विद्यार्थ्यांच्या हाल अपेष्टा सरकारला दिसत नाहीयेत, शेतकऱ्यांचे हाल सरकारला दिसत नाहीयेत. सरकार मग्रूर झाले आहे. आणि अहंकारात बुडाले आहे.
यूक्रेनच्या झेलेंस्कीनी नाटो ऐवजी आमच्या मुख्यमंत्र्यांपाशी संरक्षण मागायला हवे होते, त्यांचे टोमणे बॉब्म सगळ्यांवर भारी :
यावेळी फडणवीस, उपहासात्मकरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत म्हणाले कि, “यूक्रेनच्या झेलेंस्की यांनी नाटोला संरक्षण न मागता आमच्या मुख्यमंत्र्यांपाशी संरक्षण मागितले पाहिजे, त्यांचे टोमणे बॉब्म सगळ्यांवर भारी आहे. मात्र त्यांनी लक्षात घ्यायला हवं कि टोमणे मारून सरकार चालत नसतं.”
आमच्या एकही प्रश्नाचे उत्तर सरकारकडे नाही:
हे सरकार मुंबईच्या गुन्हेगारांना पाठीशी घालणारे सरकार आहे. आज मुख्यमंत्र्यांनी देखील नवाब मलिक यांचे समर्थन केले. हे अतिशय दुर्दैवी आहे. भ्रष्टाचाराबाबत आम्ही उपस्थित केलेल्या एकही प्रश्नाचे उत्तर सराकरकडे नाही. सत्तेची मग्रुरी आहे, आणि जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष्य नाही. असेही ते यावेळी म्हणाले.
