गेले ३ दिवस महाराष्ट्रात केवळ एकाच नावाचा बोलबाला आहे. राज्यसभेच्या निवडणूकीत भाजपला मिळालेल्या यशामागचे हे नाव आज महाराष्ट्रातील ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जात आहे. ते नाव म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मध्यरात्री राज्यसभेच्या निवडणूकांचा निकाल लागला. या निवडणूकीत अशक्य वाटणारा असा इतिहास घडला. भारतीय जनता पक्षाचे तीन उमेदवार मोठ्या मतांनी निवडून आले. या विजयाने आघाडी सरकारला मात्र हलवून सोडलेले आहे.

राज्यसभेचा निकाल लागला आणि सगळीकडे बातम्या दिसालया लागल्या ‘फडणवीसांनी पुन्हा एकदा पहाटेच्या वेळी ठाकरे यांना दिली धोबीपछाड’ या निवडणूकीत प्रतिष्ठेची असणारी सहावी जागा ही भाजपने मिळवून आघाडी सरकारला मात्र दिवसा तारे दाखवले.
मतमोजणीत भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना 44.
शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना 33, तर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांना 41 मतं मिळाली.
धनंजय महाडिक यांच्या विजयाचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना दिलं जात आहे. त्यामुळे मग फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना धोबीपछाड केल्याची चर्चा सुरू झाली आहे. आपले चारही उमेदवार जिंकून येतील, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात होता. पण, निवडणूक निकालात तसं काही झालं नाही.
शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल विजयी झाले. तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे, पीयूष गोयल आणि धनंजय महाडिक विजयी झाले. म्हणजे हुकमी एक्का अजूनही भाजपकडेच आहे. ते तीन होते, आणि भाजप एक तरी एक पक्ष तीघांवर भारी पडला, असे या निकालांमधून स्पष्ट झाले.
ज्येष्ठ राजकीय पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्या मते, “महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचं प्लॅनिंग अजिबात नव्हतं हे स्पष्ट झालंय. देवेंद्र फडणवीस यांच्या रणनितीसमोर उद्धव ठाकरे फेल ठरले.”
ज्यावेळेला महाविकास आघाडी सरकार मधील तीनही पक्षांचे आपसातच ट्यूनिंग करेक्ट नव्हते, त्यावेळेला भाजप रणनीति आखत होते. या रणनीतिनुसार मतांचं गणित हे पक्कं असणं आवश्यक होतं. मविआला आवश्यकता होती ती या पक्क्या गणिताची आणि एका चोख स्ट्रॅटेजिस्टची. मात्र त्यांच्याकडे ते दोन्ही नव्हतं. उलट भाजपमध्ये ही सगळी जुळवाजुळव करण्यासाठी, गणित पक्कं करण्यासाठी आणि रणनीति आखण्यासाठी ‘चाणक्य’ तयार होता. तो चाणक्य म्हणजे फडणवीस.
निकाल लागल्यानंतर ट्विटर वर मोठ्या प्रमाणात ट्वीट्स ना उधाण आले. त्यामध्ये एका ट्वीटमध्ये लिहीले होते. सर्व मल्ल अंगाला तेल लावून कुश्तीसाठी तयार होते, मात्र हा डाव निघाला बुद्धीबळाचा. हे किती खरं आहे नाही? एकूणच पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारचे पितळे उघडे पडले आहे.
या सगळ्यात शरद पवारांचा रोलही महत्वाचा ठरतो. मतांची खेळी बदलत असताना पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाला सेफगार्ड करत आपला गेम टाकला, आणि याचं सगळ्यात मोठं नुकसान झालं ते शिवसेनेला. संजय राऊत म्हणतात कि ते या विजयाला विजय मानत नाही. मात्र त्यांच्या मानण्या न मानण्याने सत्य आता बदलणार नाहीये.
आता पर्यंत महाराष्ट्रात ‘चाणक्य’ या नावाने प्रसिद्ध असलेले शरद पवार यांना त्यांच्याच तोडीची किंबहुना मोठी टक्कर देणारा आणखी एक नेता मैदानात उतरला आहे. अनेक जाणकारांच्या मतांप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापेक्षा विरोधीपक्ष नेते फडणवीस हे अधिक धोकादायक आहेत. हे सरकारने विसरून चालणार नाही. कारण हा खेळ आता भ्रष्टाचाराचा उरलेला नाही. हा खेळ आता बुद्धीचा आहे, रणनीतिचा आणि कूटनीतिचा आहे.
त्यामुळे आता या महाराष्ट्राचा चाणक्य कोण ? याचं उत्तर तुम्हीच द्या…!
