
एखाद्या ठिकाणी दरड कोसळी असताना सामान्य माणूस काय करेल ? तर ती दरड हटवायला प्रशासन येण्याची वाट बघेल. किंवा रस्ता मोकळा होण्याची वाट बघेल. मात्र साताऱ्यातील दोन आजोबांनी आपल्या हिंमतीने आणि केवळ एकमेकांच्या मदतीने एक मोठी दरड बाजूला करत नागरिकांची मदत करण्याचे शिवधनुष्य पेलले आणि त्यात ते यशस्वी सुद्धा झाले. ग्रामस्थ आणि पर्यटकांची ही अडचण लक्षात घेऊन दोन वयोवृद्ध नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणेची वाट न पाहता ही दरड हटवून रस्ता मोकळा केला आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जोरदार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे काही ठिकाणी दरडी कोसळू लागल्या आहेत. कास शेजारील भांबवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही दिवसापूर्वी दरड कोसळली होती. यामुळे भांबवली गाव आणि वजराई धबधब्याकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. दरड कोसळली असल्याने या रस्त्यावरून ये जा करताना ग्रामस्थ आणि पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जाव लागत होतं.
ग्रामस्थ आणि पर्यटकांची ही अडचण लक्षात घेऊन दोन वयोवृद्ध नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणेची वाट न पाहता ही दरड हटवून रस्ता मोकळा केला आहे. 65 वर्षाचे चंद्रकांत मोरे आणि 50 वर्षाचे बळीराम सपकाळ यांनी स्वतः हातात कुदळ आणि फावडे घेऊन भर पावसात मेहनत घेऊन ही दरड बाजूला केली. या दोन्ही आजोबांनी केलेल्या या कामाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केलं जातं आहे. या दोन्ही आजोबांची प्रेरणा घेऊन शासकीय यंत्रणेने देखील अशाच प्रकारचे तत्परतेने काम करण्याची गरज असल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.
हे दृष्य बघण्यासारखं आणि प्रेरणा देण्यासारखं आहे. कधी कधी सामान्य माणसालाच प्रशासन होऊन काम करावं लागतं. आणि हे दोन्ही आजोबा याचं एक मोठं उदाहरण आहेत.
