आरेत मेट्रो कारशेडचे काम सुरु…‍!

बहुचर्चित मुंबई मेट्रो आणि आरे कारशेड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आरे येथे थांबवलेले कारशेडचे काम पुन्हा एकदा सुरु झाले आहे. या कामात अडथळा येऊ नये यासाठी आरे येथे जाण्यात येण्याऱ्या प्रत्येक एंट्री पॉइंटवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. आणि आरे येथील रहिवाशांना वगळता येथे येण्याची परवानगी इतर कुणालाही नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र काही आंदोलनकाऱ्यांनी पोलिसांनी बजावलेल्या नोटीसांना झुगारुन आत येण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले असल्याची बातमी समोर आली आहे.


काही दिवसांपूर्वीच मुंबईतील आरेमधील जंगलात मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी राज्य सरकारने उठवली होती. त्यानंतर आरे मेट्रो कारशेडचे काम वेगाने सुरू होणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांकडून दिसू लागले होते. त्यानंतर आजपासून आरेमधील झाडे कापण्यास सुरुवात करण्यात आली. गोरेगाव ते पवईला जाणारा आरेमधील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. फक्त आरेमधील रहिवासींच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. आरेमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आरेमधील मेट्रो कारशेड ज्या ठिकाणी उभे करण्यात येणार आहे, त्याठिकाणी अद्याप वृक्षतोड करण्यात आली नसल्याची माहिती आहे. कारशेडच्या प्रस्तावित ठिकाणी असलेली झाडे अद्यापही कापण्यात आली नाहीत अथवा कोणतेही बांधकाम सुरू झाले नाही. मात्र, मेट्रोच्या बोगीज् आणणार आहेत, त्यामुळे लवकरच कारशेडचे काम सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एकूणच मुंबईला लवकरच मेट्रो मिळणार असल्याचे स्वप्न पुन्हा एकदा साकार होण्याचा दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. त्यामुळे या बाबतीत पुढे काय होते, आरे कारशेडचे काम कधी सुरु होते, आणि यामध्ये काही अडथळा येतो का ? आलाच तर त्यासाठी राज्य सरकारची भूमिका काय असेल हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.