बाळासाहेबांनी ‘धर्मयुद्ध’ म्हणून लढविलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे पहिले आमदार झालेले वामनराव महाडिक यांच्या कन्येचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी परळ विधानसभा मतदासंघाची पोटनिवडणूक  ‘धर्मयुद्ध’ म्हणून लढली होती. या निवडणुकीत विजय मिळवून शिवसेनेचा पहिला आमदार म्हणून मन मिळविणारे वामनराव महाडिक यांच्या कन्या हेमांगी महाडिक यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.मुखमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पक्षप्रवेश झाला.



बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत त्यामुळेच सगळे लोक आमच्यासोबत येत आहेत असे मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.

 कॉ. कृष्णा देसाई हे परळमधून आमदार होते. जूनमध्ये त्यांची हत्या झाली आणि त्याच वर्षी म्हणजे 18 ऑक्टोबर 1970 रोजी परळच्या जागी पोटनिवडणूक जाहीर झाली.या पोटनिवडणुकीत डाव्या पक्षांनी कॉ. कृष्णा देसाईंच्या पत्नीलाच म्हणजे सरोजिनी देसाईंना उमेदवारी दिली. सरोजिनी देसाईंना समाजवादी आणि काँग्रेसनेही पाठिंबा जाहीर केला. एकूण 13 पक्ष सरोजिनी देसाईंच्या बाजूनं उभे राहिले होते. शिवसेनेकडून परळमधून नगरसेवक असलेले वामनराव महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली. वामनराव महाडिक हे बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू म्हणून ओळखले जात.  जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वतंत्र पार्टीने त्यांना पाठिंबा दिला होता.

मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून काम करणाऱ्या वामनराव महाडिकांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव होता. मात्र, परळमधील बाळासाहेब ठाकरेंच्या एका सभेनंतर ते शिवसेनेत काम करू लागले. 1989 साली दक्षिण-मध्य मुंबईतून खासदारकीची निवडणूक जिंकून वामनराव महाडिकांनी शिवसेनेचे पहिले खासदार होण्याचा मानही मिळविला होता.