
मुंबई : राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आहे. त्यांच्या वक्तव्याचा शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे निषेध करणार का असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बाेलताना केला. राहूल गांधी यांच्या भारत जाेडाे का ताेडाे यात्रेच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या नेत्यांना ते पाठविणार का असेही त्यांनी विचारले आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रा’ कर्नाटकात पोहचली आहे. संघाने ब्रिटिशांना मदत केली, तर स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून स्टायपेंड ( भत्ता ) घ्यायचे,’ असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधीच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
फडणवीस म्हणाले, राहूल गांधींकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान केला जात आहे. सावरकरांना काॅंग्रेसने वारंवार अपमानित केले कारण त्यांच्या पाठीमागे माेठ्या प्रमाणात भारतातील जनता हाेती. स्वातंत्र्यानंतर जी राजकीय परिस्थिती हाेती त्यामध्ये जाणीवपूर्वक सावरकरांना अपमानित करण्याचे काम काॅंग्रेसने केले.
अकरा वर्षे अंदमानच्या कालकाेठडीत काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांनी भाेगली. अशी शिक्षा भाेगणारे फार थाेडे स्वातंत्र्यसेनानी आहेत. सगळेच स्वातंत्र्यसैनिक महान आहेत. परंतु, सावरकरांचे वैशिष्टय हे आहे की अनेक क्रांतीकारकांना त्यांनी प्रेरणा दिली. क्रांतीची संपूर्ण चळवळ त्यांनी उभी केली. इंग्रजांचे अनन्वित अत्याचार सहन करून देखील अंदमानच्या काळकाेठडीतही ते सातत्याने भारतीय स्वातंत्र्याचा विचार करत हाेते. त्याचीच काव्ये लिहित हाेते. तेथील कैद्यांना धीर देत होते. अशा स्वातंत्र्यवीराचा अपमान राहूल गांधी करतात याचे कारण राहूल गांधींना भारताचा इतिहासच माहित नाही. त्यांना काॅंग्रेसचाही इतिसहास माहित नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी भारतीयांच्या मनात सावरकरांची जी प्रतिमा त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी भारतीयांच्या मनात सावरकरांची जी प्रतिमा आहे ते ती पुसू शकणार नाहीत.
फडणवीस म्हणाले, माझा सवाल उध्दव ठाकरे यांना आहे. राहूल गांधींच्या वक्तव्याचा ते निषेध करणार आहेत की नाही? ही जी भारत जाेडाे का ताेडाे यात्रा राहूल गांधींनी सुरू केली आहे या यात्रेच्या स्वागताकरिता शिवसेनेचे नेते ते पाठविणार आहेत का? जे वक्तव्य राहूल गांधींनी केले आहे त्याचे समर्थन करणार आहेत का?
फडणवीस म्हणाले, जाती व्यवस्थेच्या विराेधात लढाइ केली. देशात समतेचे राज्य यावे म्हणून प्रयत्न केले. अशा देशाच्या सुपुत्राबाबत राहूल गांधी बाेलतात यावरून त्यांची समज किती आहे ते लाेकांना समजते. मुळातच भारत जाेडाे यात्रेला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विवादित वक्तव्ये करायची असा त्यांचा प्रयत्न आहे.
