“देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ‘विरोधी पक्ष जोडो यात्रे’मध्ये कितीही विरोधी पक्ष सहभागी झाले, तरी त्याचा उपयोग नाही,” असा टोला उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी लगाविला.

हिमाचल प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी नवी दिल्लीला आले आहेत. तत्पूर्वी त्यांनी राज्यातील विकासकामांची चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय हवाईवाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली.
यावेळी काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात येत आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सहभागी होत असल्याविषयीचा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले शरद पवार की, काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेची स्थिती पाहता ही आता ‘विरोधी पक्ष जोडो’ यात्रा झाली आहे. मात्र विरोधी पक्षांनी कितीही एकत्र येण्याचा आव आणला, तरी त्यात तथ्य नाही. कारण, देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांनाच विजय मिळणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नाराजी असल्याच्या वृत्ताचीही त्यांनी यावेळी खिल्ली उडविली. ते म्हणाले की, “सध्या काही पत्रकारांना अन्य उद्योग उरलेला नाही. सरकारविषयी विपरित बातम्या मिळत नसल्याने अशाप्रकारे ‘फॅक्टरी’त तयार झालेल्या मजेशीर बातम्या ते पसरवतात. त्यामुळे त्यांना महत्त्व देण्याची गरज नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगाविला आहे.
