बाळासाहेबांच्या शिवसेनेसह ४५ लोकसभा जिंकू – चंद्रशेखर बावनकुळे

केंद्रीय भाजपच्या निर्देशानुसार लोकसभा २०२४ च्या अनुषंगाने सुरु करण्यात आलेल्या ‘लोकसभा प्रवास दौऱ्या’चा दुसरा टप्पा लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री सहभागी होणार असून प्रत्येक मंत्र्यांकडे काही विशिष्ट मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजप लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज असून २०२४ मध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेला सोबत घेऊन महाराष्ट्रातील ४५ लोकसभा आम्ही जिंकणार आहोत,’ अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

गुरुवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. यावेळी भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष म्हणून चित्रा वाघ यांच्या नावाची घोषणा देखील करण्यात आली. तसेच अहमदनगर आणि इतर काही भागातील मंडळींच्या भाजप प्रवेशाची औपचारिकता देखील पूर्ण करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘भाजपच्या लोकसभा प्रवास दौऱ्यासाठी केंद्रातील महाराष्ट्राचे मंत्री प्रवास करणार आहेत. त्यात प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे आणि पियुष गोयल यांचा समावेश आहे. तसेच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार, कपिल पाटील हे देखील या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. भाजपच्या या लोकसभा प्रवास दौऱ्यात आणखी दोन मतदारसंघांचा नव्याने समावेश करण्यात आला असून धाराशिव आणि माढावरही आता भाजपने आपले लक्ष केंद्रित केले आहे,’ असे बावनकुळेंनी म्हटले आहे.