राहुल गांधी महाराष्ट्रात आणि कार्यकर्ते मात्र भाजपमध्ये!

“राहुल गांधी ‘भारत जोडो’चा नारा देत देशभरात यात्रा काढत आहे. रविवारी त्यांची यात्रा महाराष्ट्रात आली असून भलामोठा कार्यक्रम त्यासाठी काँग्रेसकडून आयोजित करण्यात आला आहे. पण, एकीकडे काँग्रेसचे मोठे नेते असलेले राहुल गांधी ‘भारत जोडो’साठी महाराष्ट्रात येत असताना, काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र एका पाठोपाठ एक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत,” असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘भारत जोडो’ यात्रेवर निशाणा साधला आहे. भाजपच्या ’लोकसभा प्रवास दौर्‍याच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवास दौर्‍यात रविवारी मीरा-भाईंदर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “कुठल्याही राजकीय नेत्याची यात्रा पक्षाच्या मजबुतीसाठी असते. पण, राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे महाराष्ट्रात काँग्रेस मजबूत होण्याऐवजी कमकुवत होत आहे. काँग्रेसचा एक राष्ट्रीय नेता महाराष्ट्रात येत आहे आणि दुसरीकडे रोज त्या पक्षाचे कार्यकर्ते फुटून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यामुळे यात्रेबद्दल काय चित्र निर्माण होते, हे पाहण्यासारखे आहे.”

“नंदुरबार जिल्ह्यातील तीन काँग्रेस नगरसेवकांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी मराठवाडा आणि अहमदनगरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. कारण, राहुल गांधींची यात्रा सर्वसामान्य जनता किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यासाठी नसून काही विशिष्ट नेत्यांची राहुल गांधींची जवळीक वाढावी, या हेतूने काढण्यात आली आहे,” असा आरोपही बावनकुळेंनी केला आहे.

‘उशिरा सुचलेल्या शहाणपणानंतर कितीही दौरे केले तरीही उपयोग नाही’ :

”अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदी असताना उद्धव ठाकरे यांना लोकांना भेटण्याची व त्यांची कामे करण्याची संधी होती. पण, ते अठरा महिने मंत्रालयातही गेले नाहीत. कोरोनाच्या काळात लोकांचे जीव जात होते, राज्याला गरज होती त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला आधार देण्याचे काम केले. त्यांनी आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेत थेट कोरोना केंद्रांमध्ये जाऊन जनतेची दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न केला, हे नाकारून चालणार नाही. परंतु, अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांनी आपला जीव वाचविण्यासाठी स्वतःला बंदिस्त केले. जेव्हा सत्ता आणि वेळ हातात होती, तेव्हा ठाकरेंनी जनतेसाठी काहीही केले नाही. त्यामुळे आता सत्ता गेल्यानंतर आणि उशिरा सुचलेल्या शहाणपणानंतर ठाकरेंनी राज्यात कितीही दौरे केले तरी उपयोग होणार नाही,” अशी टीकाही बावनकुळेंनी ठाकरेंवर केली आहे.