करुणा मुंडे प्रकरणाची राष्ट्रवादीला करून दिली आठवण, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांची पाेस्ट चर्चेत

मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाच्या गुन्ह्याचे निमित्त करून राष्ट्रवादी काॅंग्रेसने गदाराेळ सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांची एक पाेस्ट चर्चेत आली आहे. कुलकर्णी यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला करुणा मुंडे प्रकरणाची आठवण करून दिली आहे.


आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर हेरंब कुलकर्णी यांनी राष्ट्रवादीला एक आठवण या शीर्षकाने एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हा महाराष्ट्रातील राजकारणाचा राजकीय स्तर अधिक तळाकडे ढकलणारा आहे, त्याचा निषेधच आहे. पण आज राष्ट्रवादीचे सारे नेते ज्या सात्विक संतापाने खोटा गुन्हा कसा या विषयावर अस्वस्थ होऊन बोलत आहेत ते बघताना मला करुणा मुंडे आठवल्या. राष्ट्रवादीचेच धनंजय मुंडे यांच्या गावात त्या पत्नीच्या नात्याने गेल्या तेव्हा त्यांच्या गाडीत पिस्तुल टाकली गेली. समोरच्या अनोळखी महिला कोण आहेत हे माहिती नसताना त्यांच्यावर त्या महिलांनी थेट अट्रोसिटी टाकली गेली.

त्या १४ दिवस तुरुंगात होत्या. स्वतःच्या पत्नीवर इतक्या खालच्या पातळीवर खोटे गुन्हे टाकणाऱ्या व त्यांना तुरुंगात टाकणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या या वर्तनाविषयी राष्ट्रवादी चा एकही नेता तेव्हा बोलला नाही किंवा केसेस मागे घेण्याविषयी सांगितले नाही आणि हेच आज सारे नेते खोटे गुन्हे या विषयावरून नैतिक मुद्दे मांडत आहेत.