नवी दिल्ली : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळेच 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड हेडली याच्या विरुद्ध भारताने यशस्वी खटला चालविला. त्यांनी आवश्यक मदत केल्यामुळेच हेडलीचा जबाब नोंदवू शकलो, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सांगितले.त्यातून पुरावे मिळाल्याने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करता आली, असेही निकम म्हणाले.
पांचजन्य वृत्त समूहातर्फे दिल्लीत आयोजित काँनक्लेव्ह मध्ये उज्ज्वल निकम बोलत होते. ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
निकम म्हणाले, 26/11 मुंबई हल्ल्याच्या सूत्रधार डेव्हिड हेडली हा अमेरिकेच्या तुरूंगात होता. 26/11 चा तो सहआरोपी असल्या कारणाने त्याचा जवाब नोंदवून घेणे गरजेचे होते. पण तो अमेरिकेच्या ताब्यात होता. हेडलीचा जवाब नोंदवून घेण्याची इच्छा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडली. तेव्हा लगेचच देवेंद्रजी यांनी विचारले, “ माझ्याकडून काय मदत हवी आहे?” मी सांगितले तुम्ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी बोलून अपॉइंटमेंट घ्या.देवेंद्रजी यांनी लगेच अपॉइंटमेंट मिळवून दिली. देवेंद्रजी यांच्या कार्य तत्परतेमुळे आणि अजित डोवाल यांच्या डिप्लोमसी मुळे हेडलीचा जवाब नोंदवून घेता आला.
निकम म्हणाले, असे काम करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. ती राजकीय इच्छाशक्ती देवेंद्रजीकडे आहे. हे मी खुल्या मनाने कबूल करतो. मी हेडली पर्यंत पोहचलो, तो फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच. डेव्हिड हेडलीने भारतातील दहशतवादी आणि आयएसआय कनेक्शन यांचा खुलासा लेखी ईमेल द्वारे केला. त्याने आयएसआय मधल्या अनेक अधिकाऱ्यांचे फोन नंबर्स ईमेलद्वारे भारतात पाठवले.

डेव्हिड हेडलीला 35 वर्षांची शिक्षा अमेरिकेत झाली आहे. परंतु त्याला पाकिस्तान अथवा भारताकडे सोपवू नये या अटीवर ही शिक्षा आहे. त्यामुळे त्याचा सर्व जबाब हा ईमेल द्वारे घेता येऊ शकला.भारताने हे सगळे पुरावे स्वतःकडे ठेवलेच, पण हे पुरावे देऊन पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी केली, असेही निकम यांनी सांगितले.
