राजकारण म्हटलं कि निवडणूका या आल्याच आणि, निवडणुका म्हटलं कि चुरशीचा सामना देखील आलाच. सध्या संपूर्ण देशाचे लक्ष्य हिमाचल प्रदेश, गुजरात आणि दिल्ली या तीन राज्यांकडे लागले होते. दिल्ली येथील एमसीडी निवडणुका, गुरजात आणि हिमाचलच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होतं? विजय कोणाला मिळतो याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागले असताना आता निकाल जवळपास आले आहेत. गुजरात येथे भाजपने आतापर्यंतचा सगळ्यात मोठा विजय मिळवला आहे. आतापर्यंत भाजपने १५६ जागा जिंकल्या असून अजून मतमोजणी सुरु आहे. काँग्रेसला गुजरातमध्ये १७ जागा मिळाल्या आहेत, तर आपला केवळ ५. एकूणच गुजरात येथे पुन्हा एकदा कमळ उगवणार असे दिसत आहे.

तर हिमाचलप्रदेश मध्ये मात्र काँग्रेसने बाजी मारल्याचे समोर आले आहे. इथे देखील एकाच पक्षाला म्हणजेच काँग्रेसला क्लीनस्वीप मिळाली आहे. आतापर्यंत हिमाचल येथे काँग्रेसला ४० जागा तर भाजपला २५ जागा मिळाल्या असल्याचे समोर आले आहे. मतमोजणी सुरु आहे. तर अन्य पक्षांना येथे केवळ ३ जागा मिळाल्या आहेत. एकूणच हिमाचल प्रदेश काँग्रेसने आपल्या ‘हातात’ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
तर दिल्लीच्या एमसीडी निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाने बाजी मारली आहे. आणि आपने पूर्ण बहुमत मिळवत दुसरी जागा ही भारतीय जनता पक्षासाठी ठेवली आहे. तर काँग्रेसची हालत दिल्लीमध्ये बऱ्यापैकी खराब असल्याचे या निवडणूकांमधून स्पष्ट झालं आहे.
एकूणच राजकारण आता खूपच मनोरंजक झालं आहे. जनता मात्र गुजरात येथे भाजपच्या विजयामुळे खुश आहे, आणि जल्लोषाचे वातावरण संपूर्ण देशात आहे.
