पंडीत नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले हाेते लुटारू राजा, संतापाची लाट उसळल्यावर मागितली हाेती माफी

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांविरुध्द काॅंग्रेस आंदाेलनाचा इशारा देत आहे. परंतु, काॅंग्रेसचे  माजी पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी तर आपल्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात शिवाजी महाराजांचा लुटारू राजा (बॅंडीट किंग) असा उल्लेख केला हाेता. त्यावरून संतापाची लाट उसळल्यावर त्यांनी माफी मागितली आणि पुस्तकातूनही हा उल्लेख काढून टाकला.


संयुक्त महाराष्ट्राला काॅंग्रेसच्या तत्कालीन नेत्यांचा आणि प्रामुख्याने पंडीत नेहरूंचा कसा विरोध हाेता,  हे सर्वांना ज्ञात आहेच. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण घेऊन आले असे म्हटले जाते. परंतु, वास्तविक संयुक्त महाराष्ट्र समितीने उभारलेल्या लढ्यामुळे काॅंग्रेसला झुकावे लागले. तोपर्यंत यशवंतराव चव्हाणही विरोधात होते. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते हे दिल्लीच्या तालावर माना डोलवत हाेते. . यशवंतराव चव्हाण यांनाही देशापेक्षा नेहरू मोठे वाटत होते.  जेव्हा समितीचा लढा आणि 105 हुतात्म्यांमुळे महाराष्ट्र पेटून उठला त्यावेळी काॅंग्रेसने माघार घेतली. मात्र, तत्कालीन पत्रपंडितांनी यशवंतराव चव्हाण यांना संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्याचे श्रेय दिले.



 मराठी माणसाचा स्वाभिमान आणि अस्मिता याचे काँग्रेसला आणि पंडीत नेहरूंना कधीच साेयरसुतक नव्हते.  छत्रपती शिवाजी महाराजांची देश आणि जागतिक पातळीवर  बदनामी पंडीत नेहरू यांनी केली. त्यांनी आपल्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख बँडिट किंग म्हणजे लुटारू राजा असा केला होता. त्यावरून महाराष्ट्रात मोठे वादळ उठले होते. महाराष्ट्रातील नामवंत इतिहास संशोधकांनी आणि इतिहासकारांनी त्यांचे विधान पुराव्यानिशी खोडून काढले.  त्यामुळे नेहरूंना आपली चूक मान्य करावी लागली होती. त्यांच्या पुस्तकातून ते विधान काढून टाकावे लागले होते.

भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री राम नाईक हे सांगताना म्हणतात, नेहरूंनी शिवाजी महाराजांवर आपल्या पुस्तकात आक्षेपार्ह लिहिल्यावर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. त्यावेळी देवगिरी नावाचे काॅंग्रेसचे अध्यक्ष होते. ते नेहरूंकडे गेले. त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नेहरूंनी देशाची क्षमा मागितली. त्यांच्या पुस्तकातील हा उल्लेख काढून टाकला. बाजारात गेलेल्या पुस्तकाच्या सगळ्या प्रति परत मागविल्या.