नागपूर : सामान्यांपर्यंत उत्कृष्ठ आराेग्य सेवा पुरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सत्तेवर आल्यापासूनच प्रयत्न सुरू केले. देशभरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांचे (एम्स) जाळे उभारण्यास सुरूवात केली. नागपूरलाही त्यांनी एम्सची भेट दिली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ड्रीम प्राेजेक्ट बनला. त्याचे लाेकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते रविवारी हाेणार आहे.
स्वातंत्र्यानंतर 65 वर्षांत म्हणजे 2014 पर्यंत देशात केवळ 7 एम्स हाेती. महाराष्ट्रात तर एकही एम्स नव्हते. भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यावर नागपूरमध्ये राज्यातील एकमेव ‘एम्स’ उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने 2015 मध्ये मंजुरी दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी एम्सबराेबरच नागपूरला मेडिकल हब बनविण्याचे स्वप्न पाहिले. मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्या दृष्टीने काम सुरू केले. नागपूरजवळील मिहान येथे एम्सची उभारणी सुरू झाली. मात्र, केवळ इमारतीअभावी वैद्यकीय शिक्षण आणि सेवांपासून नागरिक वंचित राहू नयेत यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून 2017-1018 मध्येच विद्यार्थ्यांचे मेडीकल प्रवेश सुरू झाले.
काेराेनाच्या काळात तर एम्स विदर्भातील रुग्णांसाठी संजीवनी ठरले. लाखाे चाचण्या, हजाराे रुग्णांवर येथे उपचार झाले. या ठिकाणी आता औषधशास्त्र, कान- नाक- घसा रोग विभाग, श्वसन रोग विभाग, बालरोग विभाग, हृदयरोग विभाग, नेफ्रोलॉजी विभाग, दंत उपचार विभाग, नेत्ररोग विभाग, स्त्री व प्रसूतीरोग विभागसह काही क्लिनिकल विभाग आहेत. ‘एम्स’ केवळ विदर्भातील रुग्णांसाठी रामबाण उपाय ठरणार नाही. तर नागपूरला लागून असलेल्या जवळजवळ ५०० किलोमीटर परिघातील जनतेसाठी येथे रुग्णसेवा उपलब्ध हाेणार आहे.

मिहान येथे एम्सचा कॅम्पस साकारताना देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घातले हाेते. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी नागपूर एम्सचे भूमिपूजन केले हाेते. आता 11 डिसेंबर राेजी त्यांच्याच हस्ते लाेकार्पण हाेणार आहे
