ला इलाहा इल्लिल्ला म्हणत इस्लाममधील समतेचे गोडवे, हिंदू देवी – देवता, संतांचा मात्र सुषमा अंधारेंकडून अपमान

मुंबई : जगाला सहिष्णूतेची शिकवण देणाऱ्या हिंदू धर्माची टिंगल टवाळी करायची. चालीरीतींवर टीका करायची. मात्र दुसरीकडे ला इलाहा इल्लिल्ला म्हणत इस्लाममध्ये समतेचे तत्त्व शोधायचे. श्रद्धा स्थानांवर हल्ले करायचे हे सुषमा अंधारे यांचे राजकारण उघड झाले आहे.


अंधारे यांच्याविरुद्ध महाराष्ट्रभर संताप उसळला आहे. वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथ यांच्या अनुयायांनी सुषमा अंधारे ज्या पक्षात असतील, त्यांना त्या पक्षाला मतदान करणार नसल्याची प्रतिज्ञा केली आहे. मात्र अंधारे यांनी हिंदू धर्माविरुद्ध गरळ ओकतानाचे व्हिडिओ पूर्वी स्वतःच अभिमानाने समाज माध्यमांवर टाकले होते. त्यामुळे यांचा बचाव कसा करायचा यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांची भंबेरी उडाली आहे. आव्हाड, मिटकरी हे तोंडाळ नेते असोत की सर्वज्ञानी संजय राऊत कोणालाही सुषमा अंधारे यांचे समर्थन करणे शक्य झालेले नाही.

राम मंदिराच्या प्रश्नावर अंधारे यांनी कायम आक्रस्ताळी विधाने केली.जो श्रीराम आपल्या बायकोला सात महिन्यांची गर्भवती असताना जंगलात सोडतो, तो श्रीराम कसला आमचा देव?, असा अपमानास्पद सवाल सुषमा अंधारे यांनी केला होता. भगवान श्रीकृष्णाचाही त्यांनी असाच अपमान केला होता.

नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना. त्यावर अंधारे म्हणाल्या होत्या, महिला नवरात्रात चपला घालत नाहीत, ही अजब प्रथा आहे. त्यांना विचारले, का गं चपला घालत नाहीस? तर म्हणते आई बसली!! बर ती बसली तर बसली… पण मग तू बस… तेव्हा सुद्धा महिला म्हणतात, आम्ही कसं बसणार??, आई बसली!!,

महाराष्ट्राच्या संत परंपरेने पुरोगामी महशत्राची जडण घडण झाली. पण स्वतःला पुरोगामी म्हणविणाऱ्या अंधारे संतांच्या विठ्ठल भक्तीची खिल्ली उडवतात. संत नामदेवांची कथा त्यांनी संत एकनाथांची म्हणून खपवली होती. संत नामदेव महाराजांची विठ्ठल भक्तीची खिल्ली उडवताना नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन कुत्र्यामागे कसे धावले याचे खिल्ली उडवणारे वर्णन सुषमा अंधारे यांनी केले होते. तुम्ही कुत्र्यामागे पळालात. पण माणसांना खाऊ घातले नाही, असे म्हणतात.

संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी वेद वदवले. याची खिल्ली उडवली होती. त्यांनी म्हणे रेड्या तोंडी वेद वदवले… तुम्ही रेड्याला शिकवले हो… पण माणसांना कुठे शिकवले??, असा सवाल करत पूर्वी सुषमा अंधारे दलितांना भडकवायच्या. सुषमा अंधारे यांची संतापजनक वक्तव्ये व्हिडिओ रूपात सोशल मीडियावर आहेत.

अंधारे यांनी केलेला संतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्या ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मत देणार नाही, असा इशारा वारकऱ्यांनी आणि महानुभाव पंथीयांनी दिला आहे. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गट त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखवित नाही. कारण त्यांच्या पक्षात भाषणे करायलाच लोक नाहीत. मात्र अंधारे आमच्या भागात नकोत असे कार्यकर्त्यांनीच म्हणायला सुरुवात केली आहे.