वारकऱ्यांसोबतच आता ‘महानुभाव’ पंथाकडून देखील सुषमा अंधारे यांचा जाहीर निषेध…!

ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे त्यांनी केलेल्या हिंदू देवी देवतांवरच्या एका वादग्रस्त विधानामुळे वादाच्या कचाट्यात अडकल्या आहेत. “’रेड्याला शिकवण्याचे सामर्थ्य इथल्या संतांमध्ये आहे म्हणून चमत्कार, …अरे, तुम्ही रेड्यांना शिकवले रे, माणसांना कुठं शिकवलं तुम्ही,” असे विधान अंधारे यांनी केले होते. आणि त्यांच्या या विधानाने वारकरी संप्रदायाचा रोष पत्करला आहे. त्यांच्या या विधानामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी व्हावी यासाठी वारकरी संप्रदायाने मागणी केली होती. त्याच पाठोपाठ आज ‘महानुभाव’ संप्रदायाने देखील सुषमा अंधारे यांचा जाहीर निषेध केला आहे.



‘सुषमा अंधारे यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी महानुभाव पंथाकडून करण्यात आली आहे. तसेच औरंगाबाद येथील महानुभाव आश्रमामध्ये साधकांनी श्रीकृष्णाला साक्षी मानून ‘ज्या पक्षात सुषमा अंधारे राहतील त्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही.’ अशी सामूहिक प्रतिज्ञा आज घेतली.

सुषमा अंधारे यांनी आमच्या देवाबद्दल, श्रीकृष्णाबदादल देखील अपशब्द काढले, त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी महानुभाव पंथाकडून करण्यात आली आहे. आता सुषमा अंधारे यांची हकालपट्टी करण्यात येईल का ? तसेच त्या माफी मागतील का? किंवा त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येईल? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.