ठाकरे गटाची शिवसेना राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावर?

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली. परंतू ही काही नैसर्गिक किंवा एक विचारधारा असणाऱ्या पक्षांची युती नव्हती. ही युती उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वकांक्षा पोटी निर्माण झालेली युती होती. उद्धव ठाकरेची हीच महत्वकांक्षा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेमकी हेरली आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांनी महाविकास आघाडीची स्थापना केली. हे सगळं शरद पवार यांनी घडवून आणल्याने शरद पवार यांना ह्या महाविकास आघाडीत महत्व प्राप्त झाले.

 पडझडीच्या काळातून जात असलेला राष्ट्रवादी हा आपला पक्ष शरद पवार यांना त्यावेळी जिवंत ठेवायचा होता तर काँग्रेसची ह्या पेक्षा दुरावस्था होती. एकूणच ह्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची स्थापना केली गेली. भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवणे हा याचा मुख्य उद्देश असल्याचा शरद पवार बोले. तर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंच नाव चर्चेत होत. स्वतः उद्धव ठाकरे यांनी सुद्धा एकनाथ शिंदेंचं नाव सुचवलं होत. मात्र, राष्ट्रवादी पक्षातील नेते अजित पवार, जयंत पाटील अशा नेत्यांना एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करणे मान्य नव्हते व उद्धव ठाकरे यांना अनुभव नसल्याने सत्तेच्या दोऱ्या आपल्याच हाती राहील. म्हणूनच शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं. अशा निर्णयांमुळेच शरद पवार यांचा महत्व वाढत गेलं.    

   हळूहळू प्रत्येक गोष्टीत शरद पवार यांचा सहभाग वाढत गेला. सरकारमध्ये काही महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर प्रत्येक जण शरद पवार यांना भेटत होता. संजय राऊत हे देखील वारंवार शरद पवार यांचे गोडवे गात होते, कौतुक करत होते. विरोधकांना पवार समजून घेण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील असे विधान संजय राऊत करत होते. निधी वाटपात देखील दुजाभाव केला जात असे. शिसेनेच्या मंत्र्यांना व आमदारांना कमी निधी दिला जात तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना व आमदारांना निधी जास्त प्रमाणात भेटत असे. शिवसेना हळू-हळू राष्ट्रवादीची शिवसेना होत होती. हे उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्या लक्षात आले नाही कारण ते शरद पवारांचे गोडवे गाण्यात मग्न होते. 

यामुळेच शिवसेनेत गट पडण्यास सुरुवात झाली तोपर्यंत शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली गेली. अनिल परब हे परिवहन मंत्री असताना देखील एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी देखील शरद पवार गेले. राष्ट्रवादीचे इतर नेते राज्यात फिरून पक्ष वाढवण्याचे काम करत होते. संपलेला पक्ष वाचवण्यासाठी राष्ट्रवादीने शिवसेना सोबत घेतली. शिवसेनेतील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगण्याचा प्रयत्न केला की आमचे नेते शरद पवार नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीत देखील शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचे वर्चस्व जास्त राहिले. यातून एक स्पष्ट होते आता शिवसेनेचा ठाकरे गट हा राष्ट्रवादीचाच गट किंवा ‘शिवसेना राष्ट्रवादीची’ झालीये असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही.