नागपूर : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ची आज विधानसभेत अजित पवार यांनी चांगलीच इज्जत काढली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टिप्पणी करताना त्यांच्या वृत्तपत्रात बातम्या येणार. तुम्ही मनाला लावून घेणार. आम्हाला त्याचं काय देणं- घेणं आहे, असे अजित पवार म्हणाले.
विधानसभेत बाेलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून अजित पवार म्हणाले, तुम्ही ज्यांना सोडून आलात, त्यांच्या वृत्तपत्रात काही बातम्या येणार. ते तुम्ही मनाला लावून घेणार. ते तुम्ही इथे सांगणार. आम्हाला काय देणं-घेणं आहे त्याचं. यशवंतराव चव्हाणांची शिकवण बघा. आचार्य अत्रे त्यांच्यावर किती टीका करायचे. तरी ते दिलदारपणे घ्यायचे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही त्यातून बाहेर या. तुम्हाला बहुमत मिळालंय. या राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री झाले आहात. असल्या छोट्या गोष्टीत तुम्ही तुमचं मन जास्त रमवू नका.
अजित पवार यांनी यातून ‘सामना’च्या बातम्यांना काही किंमत देऊ नका, असेच एक प्रकारे मुख्यमंत्र्यांना सुचविल्याची चर्चा आहे. त्याचबराेबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्या संघर्षाचे आम्हाला काय देणे घेणे आहे असे सांगून त्यांनी शिवसेनेतील अंतर्गत वादापासून स्वत:ला दूर ठेवल्याचीही चर्चा आहे.
