नागपूर : स्वत:ला ओबीसींचे नेते समजणाऱ्या छगन भुजबळ यांनी पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अधिछात्रवृध्दीवर केलेल्या वक्तव्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पीएचडी करणे म्हणजे तांदूळ विकण्यासारख सोपे वाटतं का? असा सवाल या विद्यार्थ्यांनी केला आहे.
विधानसभेतील चर्चेत सगळे पैसे उडवून टाकणार का असे म्हणत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिछात्रवृत्ती बाबत भुजबळ यांनी अयोग्य विधान केले. यावर याच मतांवर आपण निवडून आला आहात हे विसरू नका, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
ओबीसी वर्गातील जे विद्यार्थी संशोधन करत आहेत, त्यांच्या मासिक शिष्यवृत्तीत राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने घसघशीत वाढ केली आहे. या आधी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना 21 हजार रुपये मासिक शिष्यवृत्ती मिळत होती, त्या शिष्यवृत्तीत वाढ करुन आता विद्यार्थ्यांना 31 हजारापर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे.
महाज्योतीच्या माध्यमातून पीएचडीकरिता 753 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, त्यांना या शिष्यवृत्तीचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात या शिष्यवृत्तीमुळे सरकारवर साडेचार कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. सरकारला या शिष्यवृत्तीसाठी 35 कोटींचा वार्षिक खर्च करावा लागणार आहे.
संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य मिळणार असल्याने विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले हाेते. मात्र, सगळेच्या सगळे पैसे असे उधळून चालतील का? असे म्हणत भुजबळ यांनी या निर्णयाला विराेध केला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
