मुंबई : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी हिंदुस्थान स्काऊट्स गाईड संस्थेच्या माध्यमातून केलेल्या फसवणुकीला शासकीय आदेश काढून बळ दिले असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. आमदार योगेश सागर यांनी हिंदुस्थान स्काऊट्स गाईड संस्थेच्या माध्यमातून वरुण सरदेसाईंनी शेतकऱ्यांच्या मुलांकडून प्रत्येकी 8 ते 10 लाख रुपये वसूल केल्याचा आराेप केला आहे. या प्रकरणाच्या चाैकशीची मागणी केली आहे.
हिंदुस्थान स्काऊट्स ॲण्ड गाईड संस्थेचे अध्यक्ष वरूण सरदेसाई, सचिव रुपेश कदम आणि खजिनदार पंकज चौरागडे आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना 18 नाेव्हेंबर 2021 राेजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासकीय आदेश काढला हाेता. त्यामध्ये म्हटले हाेते की,हिंदुस्थान स्काऊट ॲण्ड गाईड ही संस्था संपूर्ण देशात स्काऊटींग व गाईडसचे कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेच्या रेंजर व राेव्हर युनिट उपक्रमांना उच्च शिक्षण विभागातील सर्व महाविद्यालयात विना आर्थिक सहाय्य तत्वावर राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे करताना विभागीय सहसंचालकांना दर सहा महिन्यांनी या उपक्रमाचा अहवाल सादर करण्यास सांगितले हाेते.




या शासन आदेशाचा वापर करून हिंदुस्थान स्काऊट्स ॲण्ड गाईड ही मान्यताप्राप्त संस्था असल्याचे भासविण्यात आले हाेते. ट्रेनिंग देऊन शाळेत स्काऊट गाईडचे प्रशिक्षक म्हणून कायमस्वरुपी नियुक्ती केली जाईल, असं सांगून गरीब शेतकऱ्यांच्या मुलांकडून प्रत्येक मुलाकडून 8 ते 10 लाख रुपये घेतले.
विधानसभेत याबाबत बाेलताना योगेश सागर याबाबत म्हणाले, शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती विकून पैसे दिले. 10-10 लाख रुपये घेतले. त्यातील काही मुलांना ट्रेनिंगसाठी गोंदियाला पाठवलं. उमेश नानाजी काकडे (भद्रावती, चंद्रपूर), हेमंत भाकरे (गडचिरोली), सचिन वाडे (चंद्रपूर), सुशील वाकडे (वरोरा), योगश धानोरकर (भद्रावती), भूषण मेडपल्लीवार (गडचिरोली), महेश बोदलकर (गडचिरोली) अशा अनेक मुलांकडून 8 ते 10 लाख रुपये घेतले. यासाठी गोंदियात एक आभासी शाळा उभी केली. तिथे ट्रेनिंग दिलं. मुलं ट्रेनिंगला गेली. ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. ती मुलं तिकडे गेली. त्या शाळांनी या मुलांना हाकलून दिलं. हिंदुस्थान स्काऊट्स गाईडसोबत आमचा काहीही संबंध नाही, असेही त्या शाळांनी सांगितले.
फसवणूक झाल्यानंतर त्या मुलांनी पंकज चौरागडेला फोन केले. त्यांना सांगण्यात आलं की, हे पैसे आम्ही वरूण सरदेसाईंना दिले आहेत. पैसे परत आले, तर पैसे तुम्हाला परत करतो. ही मुले तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. त्यांची भेट झाली की नाही माहिती नाही. पण, त्यांचं संभाषण माझ्याकडे पेन ड्राईव्हमध्ये आहे,” असा दावा आमदार सागर यांनी केला आहे.
योगेश सागर यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत गंभीर आहे. सरकार निश्चितपणे याची चौकशी करेल,’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
