पुणे : उद्याेग मंत्री उदय सामंत यांची पदवी (डिग्री) बनावट असल्याचा आराेप विराेधकांकडून केला जात आहे. मात्र, सामंत यांनी पदवी घेतलेले ज्ञानेश्वर विद्यापीठ ही देशातील पहिली स्किल युनिव्हर्सिटी हाेती. केंद्र सरकारच्या आठव्या पंचवार्षिक योजनेत ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या कार्याचा गौरवाने उल्लेख करण्यात आला.
विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देण्यापेक्षा काैशल्य विकास (स्किल डेव्हलपमेंट) व्हावे असे म्हटले जाते. त्यादृष्टीने सरकार स्किल युनिव्हर्सिटीला चालना देत आहे. डाॅ. मनाेहर आपटे यांनी देशातील पहिल्या स्किल युनिव्हर्सिटीची स्थापना केली हाेती.
‘पॉलिटेक्निक स्कूल ऑफ कॉमर्स’, लंडन येथून त्यांनी बी. एस्सी (अर्थशास्त्र) ही पदवी मिळवणारे, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकौंटस् अॅण्ड मॅनेजमेंट असोसिएशन’, लंडन आणि ‘कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकौंटस् ऑफ इंडिया’ या संस्थांचे सभासद असलेले डाॅ. मनाेहर आपटे यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठाची स्थापना केली. सुमारे दोन लाख विद्यार्थी विद्यापीठातून शिकून नावारूपास आले. माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे ही या विद्यापीठाचे विद्यार्थी हाेते.
उपलब्ध साधनांचा आणि उपकरणांचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून स्वत:च्या पायावर विद्यार्थ्यांना उभे केले पाहिजे या विचाराने १९८० मध्ये त्यांनी ‘ज्ञानेश्वर विद्यापीठा’ची स्थापना केली. नोकऱ्या मागत फिरणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा नोकर्या देणार्या उद्योजकांची निर्मिती शिक्षणातून करता येईल काय? यावर त्यांचे चिंतन चालू होते. बुद्धिमत्ता, कौशल्य आणि हातोटी असताना केवळ परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून कुणाचाही तंत्र शिक्षणाचा अधिकार नाकारला जाऊ नये यासाठी मनोहर आपटे यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या रूपाने मोठी चळवळ शैक्षणिक क्षेत्रात उभी केली. ज्ञानेश्वर विद्यापीठात प्रवेश घेताना गुणांची अट नाही, देणगी, दरडोई फी नाही, गुणवत्ता यादी नाही, प्रथम येणार्यास प्रथम प्रवेश, इच्छा असेल त्या अभियांत्रिकी शाखेला प्रवेश असे जगापेक्षा वेगळे निकष त्यांनी ठेवले हाेते. केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित शिक्षण ही संकल्पनाही डॉ. आपटेंना मान्य नव्हती. पुस्तकी ज्ञानाला अनुभवाची जोड मिळाली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. म्हणून ज्ञानेश्वर विद्यापीठात प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना सहा महिने पुस्तकी शिक्षण आणि सहा महिने प्रात्यक्षिके प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्रात द्यायची असे मनोहर आपटे यांनी ठरविले. त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करून कर्तृत्वसंपन्न अभियंत्यांच्या अनेक पिढ्या घडवून त्यांनी देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले. डॉ.आपटेंच्या या संकल्पनेचे भारतभर स्वागत झाले.
2001 पर्यंत डाॅ. विजय भटकर या विद्यापीठाचे कुलगुरू होते. पुढे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू झालेल्या स्नेहलता देशमुख विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळावर होत्या. मात्र, हे विद्यापीठ सरकारमान्य नसल्याने कोर्टाच्या नोटिसीमुळे 2006 साली बंद करावे लागले.
