विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा इथं नागरिकांची गर्दी

आज नवीन वर्षाची सुरुवात सर्वंत्र होत असताना, नवीन संकल्प सुद्धा करण्यात येत आहेत, तर अनेकजण नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शानाने करत आहेत, तर दुसरीकडे कोरोगाव भीमा या ठिकाणी आज 205 वा शौर्य दिन साजरा करण्यात येत आहे. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा इथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखो नागरिकांना सकाळपासून मोठी गर्दी केली आहे. कोरेगाव इथे 1 जानेवारी 1818 मध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली. ही लढाई इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाली होती. महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले होते. हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ बांधण्यात आला. दरवर्षी कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. आज राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतायेत.

या शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी आज येणार आहेत. पहाटेपासूनच विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. 205 वर्षांपुर्वी कोरेगाव भीमा इथं झालेल्या लढाईत महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता.1 जानेवारी 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.

यंदाच्या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा परिसरात म्हणजेच शिक्रापूर आणि लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या कालावधीत मद्य विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या काळात परिसरातील सर्व मद्य दुकाने पूणर्तः बंद राहणार आहेत. या बंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले होते. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी विजयस्तंभ परिसरात नियोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.