पुणे : छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य धर्माभिमानाच्या गाेष्टी शाळेतील इतिहासाच्या पुस्तकातून सगळ्यांनीच वाचलेल्या आहेत. त्यांना धर्मवीर म्हणणे विराेधी पक्षनेते अजित पवार यांनाही चार वर्षांपूर्वीपर्यंत मान्य हाेते. अचानक त्यांच्या भूमिकेत बदल का झाला? छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते अशी उपरती त्यांना का झाली? यामागे राष्ट्रवादीचा काय अजेंडा आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असे वक्तव्य अजित पवार यांनी केली आहे. पवारांच्या या वक्तव्यावर प्रचंड संताप व्यक्त हाेत आहे. अजित पवार यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. पण मुळात अजित पवार यांची भूमिका का बदलली. यामागे राष्ट्रवादीचा काही अजेंडा तर नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे. निवडणुका ताेंडावर आल्यावर जातीय ध्रुवीकरण करण्याची राष्ट्रवादीची जुनी सवय आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीला काहीतरी अजेंडा चालवायचा आहे, असा आराेप केला आहे.
तुमच्या पक्षाचं धर्माविषयी, महापुरुषांविषयी धोरण ठरण्याआधी आपण स्वतःच नकळत का होईना खरे बोलून गेला होतात, अशी टीका अजित पवार यांच्या 2018 च्या ट्विटचा संदर्भ देऊन केली जात आहे. चार वर्षांपूर्वी पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करताना धर्मवीर हा शब्द वापरला हाेता.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केले, धर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म यांचे रक्षण केले. त्यांना औरंगजेबाने का मारलं? संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी सांगितले गेले, पण त्यांनी मान्य केले नाही. स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्मासाठी त्यांनी बलिदान दिले. त्यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे केले. तरी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वधर्म, स्वराष्ट्राची भाषा सोडली नाही. म्हणून अजित पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच पण ते धर्मवीर देखील होते.
अजित पवार यांच्या वक्तव्याचा भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांनी समाचार घेतला आहे. मुस्लिम मते मिळावीत यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे हे ‘धर्मवीर’ नव्हते हे बोलण्यापर्यंत मजल गेली आहे, अशी टीका भांडारी यांनी केली आहे.
भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी अजित पवारांनी २४ तासांच्या आत माफी मागावी अशी मागणी केली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या धार्मिक परंपरांचा प्रचंड अभिमान होता. ते धर्माचे पुरस्कर्ते होते. तुमच्या पवार घराण्याच्या फडतूस राजकारणाकासाठी छत्रपती संभाजी महाराजांना निधर्मी किंवा सेक्युलर करू नका. २४ तासांच्या आत माफी मागा अन्यथा उद्यापासून सगळा हिंदू समाज तुमच्याविरोधात रस्त्यावर उतरेल,” असा इशारा भोसले यांनी दिला आहे.
भाजपाचे नेते निलेश राणे यांनी म्हटले आहे की, मृत्यू आला तरी चालेल पण मी माझा हिंदू धर्म कधी साेडणार नाही असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणाले हाेते. अजित पवार यांनी त्यांच्या बलिदानाचा आणि हाैतात्म्याचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी.
