वरुण सरदेसाई यांच्या अडचणीत होणार वाढ.

महाविकास आघाडी सरकारमधले उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यामागे चौकशी लागली असताना ठाकरे गटाच्या शिवसेनेचे युवा सेना सचिव वरूण सरदेसाई आणि आदेश बांदेकर यांच्याही चौकशीची घोषणा झाल्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांच्यावर विधानसभेत आमदार योगेश सागर यांनी आरोप केले असून त्याच्या पुराव्यासाठी एक पेन ड्राईव्हही सादर केला.

योगेश सागर विधानसभेत म्हणाले, “हिंदुस्तान स्काऊट्स अँड गाईड नावाची कंपनी स्थापन करुन मुलांची फसवणूक झाली आहे. त्याचे अध्यत्र वरुण सरदेसाई आहेत. या कंपनीने गरीब मुलांकडून 8-10 लाख रुपये प्रत्येकी घेतले. ट्रेनिंग देऊन शाळांमध्ये स्काऊटसाठी नोकरी देऊ असं या कंपनीने तरुणांना सांगितलं होतं. त्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी शेत विकून पैसे दिलेत. त्यांना ट्रेनिंगसाठी गोंदियाला पाठवलं. त्यांना एकेक पत्र देऊन शाळांत पाठवलं गेलं. पण त्यांना अशी कोणतीही नोकरी दिली नसल्याचं त्या शाळांनी सांगितलं. हे पैसे वरुण सरदेसाईंना दिल्याचं सांगण्यात आलं. ती मुलं मुख्यमंत्र्यांना भेटायला गेली होती. त्यानंतर तुम्ही आता मुख्यमंत्र्यांना भेटलात आता तुम्ही जे करायचं ते करा, आमच्याकडून पैसे परत मिळणार नाहीत, असं संभाषण त्यांच्याद्वारे करण्यात आलेले आहे. ते या पेनड्राइव्हमध्ये आहे.”

स्काऊट्स अँड गाईड हे खेळाच्या आणि सेवेच्या संदर्भात आहे, ह्या मध्ये सेवा ह्या शब्दाला फार महत्व आहे. मात्र, वरुण सरदेसाईंना समजण्या बाहेरील हे शब्द आहे असे म्हणले तरी काही वावगे ठरणार नाही. यातून किती मुलांची फसवणूक झाली याची चौकशी केली पाहिजे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं सागर म्हणाले. यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश सागर यांनी मांडलेला मुद्दा गंभीर आहे तसेच शासन निश्चितपणे त्याची चौकशी करेल, असं आश्वासन दिले होते.