आदित्य ठाकरेंना नितेश राणे यांचा इशारा, सुशांत सिंहच्या पाेस्टमार्टम वेळीचा व्हिडीओ पुरावाच आणला समाेर

मुंबईः अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृतदेह पोस्टमॉर्टेमला नेला जात असतानाचा व्हिडिओच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी समाेर आणला आहे. पाेस्टमार्टमच्या अहवालात गडबड केल्याचा आराेप करणारे रुपकुमार शहा या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. त्यामुळे शहा यांच्या आराेपांना बळकटी आली आहे. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल आणि आता बेबी पेंग्विन दूर नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

मृतदेहावर बऱ्याच जखमा होत्या. सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या नसून हत्या झाली असावी, असा दावा पोस्टमॉर्टेमच्या वेळी उपस्थित रुपकुमार शाह यांनी केला हाेता. मात्र, रुपकुमार शाह हे पोस्टमॉर्टेमच्या वेळी उपस्थित होते का असा सवाल ठाकरे समर्थकांकडून केला जात आहे. रुपकुमार शाह 13 ते 14 जून 2020 ला कुपर रुग्णालयातील शवागृहात कर्तव्यास होते, हे सांगण्यासाठी नितेश राणेंनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.  यात सुशांत सिंहचा मृतदेह घेऊन जाणारे रुपकुमार शाह दिसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात रूपकुमार शाह यांच्या शंकेमुळे नवे वळण लागले आहे. ही आत्महत्याच असल्याचा अहवाल देण्यात आला होता. मात्र, पोस्टमॉर्टेम अहवालात राजकीय दबावतंत्र वापरण्यात आल्याचा आरोप शहा यांनी केला आहे. 

सुशांत सिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संबंध असल्याचा आरोप भाजपच्या काही नेत्यांच्या वतीने करण्यात येतोय. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी कऱण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. रुपकुमार शाह यांना विशेष सुरक्षाही देण्यात आली आहे.
14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतच्या निधनाचे वृत्त समोर आले होते.  पोलिसांना संशयास्पद स्थितीत त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्या असल्याचे अहवालात म्हटले गेले. मात्र रुपकुमार शाह यांनी पोस्टमॉर्टेम रिपोर्टवेळी गडबड झाल्याचा दावा केल्यानंतर या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळाले आहे.