व्वा रे सर्वज्ञानी संपादकांचा संभाजी महाराजांवर अभ्यास ‘सामना’च्या अग्रलेखात विकिपीडियावरील मजकुराची काॅपी

मुंबई : स्वत:ला सर्वज्ञानी समजणारे ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी मंगळवारी लिहिलेल्या ‘छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक की धर्मवीर? अण्णाजी पंतांचे तारतम्य’ या अग्रलेखात विकिपीडियावरील मजकुराची सरळ सरळ काॅपी केली आहे. विकिपीडियावर संभाजी महाराज हा शब्द न वापरता संभाजीराजे असे म्हटले आहे. त्यामुळे सामनाच्या अग्रलेखातही संभाजी महाराज असे न म्हणता संभाजीराजे हाच शब्द वापरला आहे. संभाजीमहाराज का म्हणत नाही, असाही सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

अजित पवार यांच्या वक्तव्याच्या संदर्भात मंगळवारच्या सामनाच्या अंकात अग्रलेख लिहिला आहे. या लाेकांना संभाजीराजे कळलेच नाहीत असे म्हणताना अग्रलेखात परिच्छेदच्या परिच्छेद विकिपीडियावरून काॅपी करून लिहिले आहे.

यातील तिसरा परिच्छेद पूर्णपणे काॅपी आहे. त्याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे :
*संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते.

  • शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाऊंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजी महाराजांचा अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजी महाराजांना ते मान्य होणे कठीण होते. अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजी महाराजांच्या विरोधात गेले. दरबारातील काही मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले; हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरून केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजी महाराजांना पाठवावे लागले.
    विकिपीडियावरून मजकूर काॅपी करताना प्रत्येक वेळी ‘संभाजीराजे’ असे म्हटले आहे. छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख केलेला नाही. यावरून विकिपीडियाच्या मजकुरातच फेरफार करून हा अग्रलेख लिहिल्याचे स्पष्ट झाले आहे.