विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका शिंदे गटासोबत युती करूनच लढणार-भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे.

आगामी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका निवडणुका ताकतीने लढवण्यासाठी भाजपची तगडी टीम कामाला लागाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यातील ४५ जागा मिळणारच, अशी घोषणाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. त्यामुळे राज्यात शिंदेंसोबत युतीत असलेला भाजप आगामी निवडणुकांमध्ये युतीनुसार लढणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.तसेच ठाकरे गटकडून देखील शिंदे गटातील नेत्यांना वारंवार डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेच्या महाराष्ट्रातील 48 जागांसाठी भाजप जोरदार प्रयत्न करणार आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका शिंदे गटासोबत युती करूनच लढणार आहोत, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.

विशेष म्हणजे शिंदे गटाचा उमेदवार ज्या ठिकाणी उभा करणार त्याठिकाणी आम्ही जास्त ताकद लावू, युतीचा उमेदवार विजयी करू, असं आश्वासन बावनकुळे यांनी दिलंय. भिवंडी येथील पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिंदे फडणवीस यांच्या समन्वयाने महाराष्ट्रातल्या लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत प्रत्येक निवडणुका आम्ही एकत्र लढू आणि ५१ टक्के मतं घेण्याचा प्रयत्न करू. जिथे शिंदेंचे उमेदवार असतील तिथे आम्ही ताकदीने मदत करू. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा प्रवास सुरु केला आहे. काल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांचा चंद्रपुरात आणि औरंगाबादेत दौरा झाला. राज्याचा 80 टक्के दौरा पूर्ण झाला असून जानेवारी अखेरपर्यंत उर्वरित दौरा पूर्ण होईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. भाजपच्या नेत्यांनी आत्तापर्यंत 45 जिल्ह्यांचा प्रवास केला आहे. राज्यात 25 लाख युवा वॉरीअर्स काम करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. केंद्र सरकारच्या विविध योजना किती प्रभावी आहे, हे ठसवण्याचा प्रयत्न या यात्रांमधून होतोय.