उघड्या, नागड्या फिरणाऱ्यांना जाब विचारवासा वाटला नाही, चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकरांना सवाल

मुंबई : महिला आयोगाचे काम महिलांचा सन्मान जपणं, मान राखणं आहे. मग, उघड्या, नागड्या फिरणाऱ्यांना आयोगाला जाब विचारावासा वाटला नाही, असा हल्लाबाेल भारतीय जनता पक्षाच्या महिला माेर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना केला आहे.

‘बिग बॉस’ फेम उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांच्या मुद्द्यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी केली. यावरून रुपाली चाकणकर यांनी “प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणी काय कपडे घालावेत हा ज्याचं त्यानं ठरवायला हवं, असे म्हटले हाेते.  यावरून रुपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबाेल करताना चित्रा वाघ म्हणाल्या, एखादी महिला मुंबईत उघडी-नागडी फिरत आहे. समाजमाध्यमांत अश्लील, घाणेरडे व्हिडीओ व्हायरल होत असताना सुमोटो दाखल करुन कारवाई का केली नाहीत. यासाठी महिला आयोगाला वेळ नसेल तर, मग त्या पदावर बसण्याचा कोणाला अधिकार नाही.

उर्फीबरोबर महिला आयोग सुद्धा बेफाम झालं आहे का? असा सवाल करत वाघ म्हणाल्या,  ट्वीटरवर आलेल्या बातमीची दखल घेऊन महिला आयोगाने वेब सीरीजच्या अभिनेत्री आणि दिग्दर्शकाला नोटीस बजावली होती. या वेब सीरीजच्या पोस्टरमुळे धुम्रपानाचं समर्थन आणि अंगप्रदर्शन होत असल्याने कारवाई करण्यात आली. मग येथे तर लाईव्ह शो सुरु आहे. ट्वीटरच्या बातमीची दखल घेणारं महिला आयोग मुंबईच्या रस्त्यावरील चाललेल्या नंगानाचची दखल घेऊ शकत नाही का?