भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे औरंगजेबच्या कबरीवर फुले वाहत आहेत असा दावा करणारा फाेटाे ट्विट करण्याची नामुष्की राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर आली आहे. जर ट्विट करण्याआधी विचार केला असता तर ट्विट डिलिट करण्याची वेळ आली नसती. मध्यरात्री ट्विट करणारे नशेत असतात, असे म्हणत भाजपाने आव्हाड यांच्यावर हल्लाबाेल केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रशेखर बावनकुळेंचा एक फोटो शेअर करत त्यांनी औरंजेबच्या कबरीला फुले वाहिली असे म्हटले आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवर त्यांनी हा फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा देखील फुले वाहताना दिसत आहेत.
“जितेंद्र आव्हाड मान्य आहे, औरंग्या तुमचा आदर्श आहे, तुमचा आयडॉल आहे. म्हणून तुम्हाला सगळीकडे औरंग्याच दिसतो आहे. आव्हाड तुम्ही औरंग्याच्या प्रेमात तुम्ही एवढे आंधळे झालात की, पवित्र दर्गा देखील तुम्हाला औरंग्याची कबर वाटत आहे. तुमची ही विकृती मुस्लिम धर्मियांचा अपमान करत आहे, अशा शब्दांत भाजपने जितेंद्र आव्हाड यांना सुनावले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, चंद्रपूर येथील पवित्र दर्ग्याचे आम्ही दर्शन घेतले हाेते. त्यावेळी मुस्लिम परिवारही उपस्थित हाेते. जितेंद्र आव्हाड भूगाेल विसरले काय? पवित्र दर्ग्याची तुलना तुम्ही औरंगजेबाच्या थडग्याशी केली. इतका निचपणा आम्ही मुसलमानांच्या विराेधात नाही तर दहशतवादाच्या विराेधात आहाेत.
