उद्धव ठाकरे व बाळासाहेब आंबेडकर यांच्या संभाव्य युतीची चर्चा सध्या सुरु आहे. मुंबई महानगर पालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन ही युती होण्याची शक्यता आहे. ह्या युतीमुळे नेमकं कुणाला फायदा होईल आणि ही संभाव्य युती होईल का हा एक प्रश्न आहे. मुळात महाविकास आघाडीसोबत युती असल्यामुळे जागा वाटपाबाबत ठाकरे गटाला विचार करणं गरजेचं आहे. महाविकास आघाडीतील काही पक्षांना आम्ही ठाकरे गटासोबत नको आहोत असं बाळासाहेब आंबेडकर म्हणाले. आंबेडकर यांचा रोख हा राष्ट्रवादीकडे आहे, आम्ही देखील राष्ट्रवादीसोबत जाणार नाहीत. राष्ट्रवादीला देवेंद्र फडणवीस भडकवतील आणि स्वतंत्र लढायला लावतील यातून महाविकास आघाडी टिकणार नाही हे बाळासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांच्या हातून सत्ता गेली त्यांचे आमदार ही गेले एक मोठा गट पक्ष सोडून गेला हे सगळं झाल्यानंतर ते प्रत्यक्ष जरी काही बोलत नसतील तरी राष्ट्रवादी ही आता उद्धव ठाकरे यांना ओझं झालीये. जोपर्यंत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, सत्ता होती व आदित्य ठाकरे यांना देखील मंत्रीपद होत कुटुंबातील इतर लोकांना देखील त्यांनी याचा फायदा करून दिला. कदाचित याच गोष्टीमुळे कार्यकर्ते व पक्षातील इतर नेते नाराज झाले असतील व पक्षात फूट पाडण्याचं हे एक प्रमुख कारण असावं. मुंबई प्रांतात राष्ट्रवादीची जास्त ताकद नाहीये. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून ठाकरे गटाला जास्त फायदा होणार नाही. काँग्रेसची देखील हीच परिस्थिती आहे. परंतु जागा वाटपाच्या बाबत सगळ्यांना समान जागा वाटप कराव्या लागतील ठाकरेंना कळून चुकलं असावं.
राष्ट्रवादीला दूर करायचं असेल तर वंचित हाच कदाचित उद्धव ठाकरे यांच्या समोर योग्य पर्याय आहे. परंतु यातून वंचितच्या हाती काही लागणार का? कारण उद्धव ठाकरे यांनी आधीच संभाजी ब्रिगेड सोबत युती केली आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी आधीच जाहीर केले आहे की आम्हाला ठाकरे गटाकडून मिळेल तेवढ्या जागा आम्ही लढू. मुळात वंचितांना न्याय देण्यासाठी व प्रस्थपित पक्षांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी वंचितची स्थापना बाळासाहेब आंबेडकर यांनी केली. आता प्रस्थपित पक्षासोबतच ते युती करत आहेत. ह्या युतीचा फायदा बाळासाहेब आंबेडकारांना होईल का नाही? हे आत्ताच सांगता येणार नाही परंतु याचा फायदा ठाकरे गटाला नक्की होईल हे मात्र नक्की सगळ्यात महत्वाचं राष्ट्रवादीला बाजूला सरकवन्यासाठी वंचितचा उपयोग ठाकरे गटाला होईल हे नक्की.
मुळात बाळासाहेब आंबेडकर यांनी आपली भूमिका ठाम ठेवनं गरजेचं आहे ह्या आधी ही एमआयएम सोबत युती केली होती. त्याचा फायदा वचिंत बहुजन आघाडीला झाला नाही. परंतु एमआयएमला मात्र याचा फायदा झाला त्यांचा १ खासदार देखील निवडून आला. आता परत तोच फायदा कदाचित उद्धव ठाकरे यांना देखील होईल.
