१९० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ‘दर्पण’ हे मराठीमधले पहिले वृतपत्र आचार्य बाळशास्त्री जाभेकरांनी सुरु केले. हाच दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ‘पोंभुर्ले’ या गावी झाला.
वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी जन्मदिनी दि.६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या पत्राची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. राष्ट्रभक्ती आणि सामाजिक सुधारणा या दोन्ही भूमिका नजरेसमोर ठेवून त्यांनी ही सुरुवात केली. सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात केले. बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय यांनी सुधारणांचे नवयुग आरंभिले तेच कार्य बाळशास्त्री जांभेकरांनी! महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील व वैचारिक चळवळ सुरू केली. त्यांनी समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृद्धी हेच आपले जीवनकार्य मानले.
बाळशास्त्री जांभेकर हे मुंबईतील एल्फीस्टन कॉलेजमधील हिंदी विषयाचे पहिले प्राध्यापक होते. तसेच
ते खगोल अभ्यासक देखील होते. त्यांनी काही काळ कुलाबा वेधशाळेतही संचालक म्हणून सेवा दिली.
अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे बाळशास्त्री जांभेकरांनी आपल्याला रोज माहिती अपडेट करणाऱ्या वृत्तपत्र
व्यवसायाची मुहूर्तमेढ करुन दिली. त्याचा प्रवास नंतर टिव्ही, वृत्तवाहिनी ते आजच्या सोशल मिडियापर्यंत
आला आहे.
त्यांनी ‘दर्पण’ मध्ये एकही जाहिरात त्यांनी छापली नाही. अगदी स्वत:चे पैसे टाकून जवळपास आठ वर्षे लोकांसाठी वृत्तपत्र त्याकाळी सुरु ठेवले. यावरुनच आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा वृत्तपत्र सुरू करण्यामागील हेतू स्पष्ट होतो. तत्कालीन गव्हर्नर जेम्स कार्नाक यांनी ‘जस्टीस ऑफ पीस’ असा किताब देऊन बाळशास्त्रींचा गौरव केला. अत्युच्च विद्वत्ता असलेल्या बाळशास्त्री जांभेकरांना जीवनाने मात्र कमी साथ दिली. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी १७ मे, १८४६ साली बनेश्वर येथे अल्पावधीच्या आजाराने त्यांचे निधन झाले.
