मुंबई: सैरंध्रीला नवरा मुख्यमंत्री होतो की नाही यात रस नव्हता, तर मुलाला मंत्री करायचं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि कारभार सुरू झाला. मुळात ‘औकात’ नसलेल्या माणसाला गादीवर बसवण्यात आलं. त्यांचं आजारपणही खरं होतं की खोटं माहिती नाही, पण कारभार त्यांच्या पत्नीला करायचा होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आजारी पाडण्यात आलं,” असा आरोप मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला.
महाजन यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरह गंभीर आरोप केले आहेत. रश्मी ठाकरेंनी सरकारच्या कारभारात हस्तक्षेप केल्यामुळेच उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले, असा आरोप करताना महाजन म्हणाले, आपण नेहमी म्हणतो, राजहट्ट, बालहट्ट, स्त्रीहट्ट. एक स्त्रीहट्ट उभा राहिला आणि एक महाविकासआघाडी तयार झाली. ही आघाडी तयार करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील नारद शरद पवार, झाकणझुले संजय राऊत यांचा समावेश होता. सत्तेशिवाय यांना करमत नाही. त्यामुळे या जोडगोळीने मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंना पटवण्यासाठी एक काम केलं आणि उद्धव ठाकरेंच्या घरी सैरंध्रीने केस मोकळे सोडले. “महाभारतात धर्मराजाने आपलं सर्व राज्य, भाऊ, बायको पणाला लावले आणि युद्धात हरले. इथं मात्र, कारभार सुरू झाला आणि बायकोने इतका हस्तक्षेप केला की, नवऱ्याचं राज्य पणाला लागलं, मुख्यमंत्रीपद गेलं. अर्थात ते आलंच असं होतं की, जाण्याचं दुःख वाटण्याचं कारण नाही, असेही महाजन म्हणाले.
