मुंबई : महावितरण कंपनीमध्ये गेल्या तीन महिन्यांत चमत्कार घडला आहे. गेल्या तीन महिन्यांत वीज विक्रीत 3 टक्के वाढ झाली आहे. ग्राहकांची संख्या तेवढीच असताना विक्रीमध्ये झालेल्या वाढीचे मुख्य कारण वीज चाेरीविराेधात उघडलेल्या माेहीमेमुळे हे शक्य झाले आहे.
वीज मीटरचे अस्पष्ट फोटो पाहून बिल पाठविण्याचे प्रमाण जानेवारी 22 मध्ये 45.6% होते, ते नोव्हेंबर 22 मध्ये 1.9% वर आणले आहे. रीडिंग घेणाऱ्या 76 संस्थांना बडतर्फ करण्यात आले. बिलिंग तक्रारी कमी करण्यावर मोठा भर देण्यात येत आहे. मीटर रीडिंगमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या एजंसीविरुद्ध महावितरणने २०२२ मध्ये कारवाई केली. परिणामी नागरिकांना होणारा त्रास आणि मीटर रीडिंगमध्ये होणाऱ्या त्रुटी, दोन्ही कमी झाले. त्यामुळे महावितरणचे उत्पन्नही वाढले आहे.
महावितरण वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून वीज विकत घेऊन तिचे ग्राहकांमध्ये वितरण करण्याचे काम करते. मात्र, गळतीमुळे महावितरणचे माेठ्या प्रमाणावर नुकसान हाेते. देवेंद्र फडणवीस यांनी उर्जा मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यावर महावितरण कंपनीला फायद्या आणण्यासाठी अनेक निर्णय घेतले. वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध महावितरण ने केली कारवाई! वीजचोरीचे प्रकार थांबवण्यासाठी महावितरणच्या भरारी पथकाने राज्यातील विविध भागात तपासणी मोहीम सुरू केली असून नोव्हेंबर 2022 मध्ये वीजचोरीच्या एकूण ९१२ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे. चाेऱ्यांवर आळा घातल्याने आता या ग्राहकांना वीजबिल भरून वीज विकत घ्यावी लागत आहे. त्याचा फायदा महावितरणला झाला आहे. वीज विक्रीत तीन टक्के वाढ झाल्यामुळे काही काेटी रुपयांचे महावितरणचे उत्पन्न वाढले आहे.
