मुंबई : आगामी महापालिका-जिल्हा परिषद निवडणुका ते 2024 च्या लाेकसभा-विधानसभा निवडणुका, जातीय ध्रुवीकरण करूनच लढवण्याची तयारी राष्ट्रवादी काॅंग्रेसने केली आहे. यासाठी राज्यात जागर यात्रा काढण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. जितेंद्र आव्हाड आणि अमाेल मिटकरी या दाेघांच्या नेतृत्वात ही यात्रा निघणार आहे. या निमित्ताने राज्यात जातीय ध्रुवीकरण करण्याची याेजना आखली असल्याची चर्चा आहे.
जेम्स लेन आणि भांडारकर हल्ला प्रकरणानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसला जातीय ध्रुवीकरण हा यशाचा मार्ग सापडला हाेता. त्यावेळी आर.आर.पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वतीने भूमिका मांडली हाेती. आता ही जबाबदारी आव्हाड आणि मिटकरी यांच्यावर देण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक या मुद्यावर ही भडकवाभडकवी केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत हे वक्तव्य केल्यावर त्याला समाजाच्या काही घटकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे राष्ट्रवादीला जाणवले आहे. त्यामुळे या मुद्यावर अत्यंत आक्रमक असलेल्या दाेघांवर त्याची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. त्याचबराेबर राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महापुरुषांचा अपमान हा मुद्दाही राष्ट्रवादी वापरणार आहे.
यात्रेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज ते स्वातंत्र्यसंग्राम मधील नेते यांच्या गाथा सांगण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात मेळावे घेऊन पुरोगामी विचाराचे पक्ष,व्यक्ती,संस्था यांना मेळाव्यात आमंत्रण देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महापुरुषांची गाथा सांगण्यात येणार आहे, असे पक्षाने म्हटले आहे. मात्र, त्यामधील छुपा अजेंडा एका विचारसरणी विराेधात आक्रमक हाेत, जातीय ध्रुवीकरण करणे हाच असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
